साहित्य खरेदीसाठी सुरू झाल्या हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 11:51 PM2018-08-03T23:51:32+5:302018-08-03T23:54:03+5:30
महिना लोटूनही नगर परिषद कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी ‘चिमुकल्यांच्या हाती काहीच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते.
कपिल केकत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महिना लोटूनही नगर परिषद कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य पडलेले नाही. हा प्रकार ‘लोकमत’ने २३ जुलै रोजी ‘चिमुकल्यांच्या हाती काहीच नाही’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशीत केले होते. याची दखल घेत नगर परिषद प्रशासन कामाला लागले असून कॉन्व्हेंटसह शाळांतील साहित्य खरेदीसाठी हालचाल सुरू केली आहे. नगर परिषद साहित्यांची यादी तयार करीत असून खरेदीसाठी ई- निविदा काढणार आहे.
नगर परिषदेने मागील वर्षापासून शहरातील त्यांच्या शाळांना जोडून ११ कॉन्व्हेंट सुरू केले. शहरातील गरीब परिवारातील चिमुकल्यांना चांगले शिक्षण मिळावे. या दृष्टीकोनातून केलेला हा प्रयोग प्रशंसनीय आहे. नगर परिषदेच्या या प्रयोगाला दाद देत शहरातील सुमारे २५० चिमुकल्यांचा प्रवेशही पहिल्याच वर्षी झाला होता. मागील वर्षी नगर परिषदेकडून कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांना गणवेश, वह्या-पुस्तके, जोडे-मोजे यासह अन्य शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले होते.
नगर परिषदेने दिलेल्या आश्वासनांपेक्षा कमीच साहित्य चिमुकल्यांना वाटप केले होते, मात्र त्यालाही उशीर झाला होता. यंदाही तीच स्थिती कायम होती. शाळांना सुरूवात होऊन महिनाभराचा कालावधी लोटल्यावरही कॉन्व्हेंटमधील चिमुकल्यांना आतापर्यंत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले नव्हते. त्यामुळे सध्या या चिमुकल्यांना कॉन्व्हेंटमध्ये या आणि जा असाच दिनक्रम सुरू आहे. कॉन्व्हेंटसाठी शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली. यातील काही शिक्षिका चिमुकल्यांना थोडफार शिकवित असल्याची माहिती आहे. मात्र असे असतानाही या चिमुकल्यांकडे वह्या-पुस्तके व गणवेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चिमुकल्यांना सर्व साहित्य नगर परिषद देणार असे आश्वासन देऊनच कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले. मात्र आतापर्यंत चिमुकल्यांच्या काही काहीच दिले नाही. यामुळे पालकांमध्ये रोष व्याप्त आहे. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर नगर परिषद प्रशासन खरेदीसाठी धावपळ करीत आहे.
कॉन्व्हेंटसह शाळांसाठी साहित्य खरेदी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार, तयारी सुरू असून लवकरच ई-निविदा काढली जाणार आहे. मात्र याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधिताला दिले नोटीस
‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच त्याची दखल घेत नगराध्यक्षांनी संबंधित कर्मचाºयाला बोलावून याचा जाब विचारल्याची माहिती आहे. यासाठी त्यांना नोटीसही देण्यात आल्याची चर्चा सध्या नगर परिषद वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच सध्या साहित्य खरेदीसाठी धावपळ सुरू असून निविदा काढली जाणार आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात साहित्य खरेदी करण्यात आली होती.त्यात चांगलेच राजकारण झाले होते. त्यामुळे खरेदीला घेऊन काहींच्या नजरा लागल्या आहे.