बीजीडब्ल्यूतील घाणीने खासदार संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:12 AM2018-07-11T00:12:56+5:302018-07-11T00:14:07+5:30
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वार्डात पाणी साचल्याचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर मंगळवारी (दि.१०) खा. मधुकर कुकडे यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला आकस्मीक भेट देवून परिसराची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या वार्डात पाणी साचल्याचा मुद्दा लोकमतने लावून धरल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर मंगळवारी (दि.१०) खा. मधुकर कुकडे यांनी बीजीडब्ल्यू रुग्णालयाला आकस्मीक भेट देवून परिसराची पाहणी केली. रुग्णालयाच्या आवारातील घाणीचे साम्राज्य पाहुन कुकडे चांगलेच संतापले. रुग्णालयाच्या साफ सफाईचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराचे बिले रोखून त्यांना नोटीस बजाविण्याचे निर्देश शासकीय वैद्यकीय महविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांना दिले. रुग्णालयातील विविध असुविधांवरुन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
खा.कुकडे यांनी मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास बीजीडब्ल्यू रुग्णालयाला भेट दिली. या भेटीची माहिती आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना मिळाल्याने ते पूर्वीच बीजीडब्ल्यू रुग्णालयात पोहचले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपले पितळ उघडे पडू नये म्हणून रुग्णालयाच्या आवारात काम सुरू केले असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. कुकडे यांनी सुरूवातीेला रुग्णालयाच्या सांडपाण्याचा निचरा होणाऱ्या नाल्याची व गटाराची पाहणी केली. तसेच रुग्णालयाच्या आवारात नाल्या व त्या परिसरात साचलेला केरकचरा पाहून अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. या केरकचऱ्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या रुग्णालयात महिला आणि नवजात बालके दाखल आहेत. अशा दूषीत वातावरणामुळे त्यांना आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रूग्णालयाच्या साफ सफाईचे कंत्राट असलेल्या कंत्राटदाराला नोटीस बजावून नियमित चांगली साफ करण्यास सांगीतले. अन्यथा सदर कंत्राटदाराची बिले थांबविण्याचे निर्देश रूखमोडे यांना दिले. या भेटी दरम्यान त्यांनी महिला आणि बालके दाखल असलेल्या वार्डाची व त्यांना मिळत असलेल्या सोयी सुविधांची माहिती घेतली. ज्या वार्डात पावसाचे गुडघाभर पाणी साचले होते, त्या परिसराची पाहणी करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने काय उपाय योजना केल्या याचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. रुग्णालयाच्या जीर्ण झालेल्या इमारतीची पाहणी केली. या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील, जिल्हा शल्यचिकीत्सक खंडाते व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागाच्या ११ पत्रांना केराची टोपली
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत दुरुस्ती, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दुरूस्ती आणि रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी शौचालयाचे बांधकाम करण्यात यावे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व बीजीडब्ल्यूचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला ११ पत्रे दिली. मात्र या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रांना केराची टोपली दाखविली. त्याचाच त्रास रुग्णांना सहन करावा लागत असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाºयांनी कुकडे यांच्या निदर्शनास आणून दिली.
जीर्ण इमारतीतून काम सुरू
बीजीडब्ल्यू रुग्णालयाची इमारत १९४३ मध्ये तयार करण्यात आली. आता या इमारतीला ७५ वर्षे पूर्ण झाले आहे. त्यामुळे इमारतीचा बराच भाग जीर्ण झाला असून पावसाळ्यात इमारतीला गळती लागते. त्यामुळे ही इमारत पाडून नवीन इमारत तयार करण्याची गरज होती. मात्र शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने या जीर्ण झालेल्या इमारतीत रुग्णावर उपचार केले जात आहे.
वीज गेल्यास रुग्ण अंधारात
बीजीडब्ल्यू रूग्णालयात वीज पुरवठा खंडीत झाल्यास तो सुरळीेत ठेवण्यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र मागील सहा महिन्यापासून जनरेटर बिघडले आहे. तेव्हापासून त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास रुग्णालयात अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
केरकचऱ्याची योग्य विल्हेवाट नाही
बीजीडब्ल्यू रुग्णालयातील जैविक कचरा नेण्याचे कंत्राट नागपूर येथील कंत्राटदाराला दिले आहे. त्यामुळे जैविक कचºयाची नियमित उचल केली जाते. मात्र इतर कचऱ्याची साफसफाई करण्याची जबाबदारी सफाई कंत्राटदार आणि नगर परिषदेची आहे. पण कंत्राटदार आणि नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे रुग्ण बरा होण्याऐवजी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘आॅल इज वेल’ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न
बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या वार्डात पाणी शिरल्यानंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुुर्लक्ष केल्याची बाब पुढे आली.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली चूक लपविण्यासाठी रूग्णालयाच्या डागडूजीचे काम सुरू केले असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न खासदार कुकडे यांच्यासमोर केला.