खासदार पटेलांनी घेतला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 11:59 PM2018-02-09T23:59:04+5:302018-02-10T00:00:06+5:30
१ जून २०१७ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा व रस्ता रोको प्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) येथील न्यायालयात जावून जामीन घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : १ जून २०१७ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकरी मोर्चा व रस्ता रोको प्रकरणी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) येथील न्यायालयात जावून जामीन घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १ जून २०१७ रोजी शहरातील नेहरू चौक ते जयस्तंभ चौक दरम्यान शेतकरी मोर्चा काढला होता. पश्चात जयस्तंभ चौकात रस्ता रोको आंदोलन करून खासदार पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी अटक करवून घेतली होती. आंदोलनाचे नेतृ्त्व प्रफुल्ल पटेल यांनी केले होते. त्यामुळे कलम १३५ अंतर्गत खासदार पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश समिती सदस्य अशोक गुप्ता, नानू मुदलीयार, नगरसेवक विजय रगडे व शहर अध्यक्ष अशोक सहारे यांच्यासह २०० कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील अन्य सहा जणांनी सुमारे एक महिनापूर्वी जामीन घेतला होता.
तर खासदार पटेल यांचे जामीन घ्यायचे होते. शिवाय सर्व सहा जणांना न्यायालयात हजर राहणे गरजेचे असल्याने खासदार पटेल यांनी शुक्रवारी (दि.९) द्वितीय सह दिवानी न्यायाधीश (क.स्तर) आ.ब.तहसीलदार यांच्यापुढे हजर होवून जामीन घेतला. याप्रसंगी त्यांच्यासह अन्य पाच जण उपस्थित होते.
खासदार पटेल यांच्यावतीने अॅड. निजाम शेख, अॅड. विनोद जानी व अॅड. अभिजीत सहारे यांनी काम बघितले. तर शैलेश पटेल यांनी खासदार पटेल यांचा जामीन घेतला. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.