दारूविक्रेत्यावर एमपीडीएची कारवाई ; लोकांमध्ये होती दहशत
By नरेश रहिले | Updated: February 15, 2025 19:05 IST2025-02-15T19:04:38+5:302025-02-15T19:05:03+5:30
Gondia : काय आहे एमपीडीए कायदा?

MPDA takes action against liquor vendor; there was panic among the people
गोंदिया: जिल्हा पोलीस प्रशासनाची हातभट्टी दारू निर्मिती/ विक्री करणाऱ्या धोकादायक गुंडाविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी कायद्यान्वये स्थानबध्दतेचे आदेश दिलेत. राहुल भजनदास गेडाम (२५) रा. आसोली (गोंदिया) याला एका वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह चंद्रपूर येथे केले स्थानबद्ध केले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी म्हणून पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या गुन्हेगारांवर आणि वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी धोकादायक गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगार व्यक्तीवर एमपीडीए (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यान्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीणचे प्रभारी अधिकारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक समीर महेर यांनी आसोली येथील राहणारा धोकादायक गुंड राहुल भजनदास गेडाम (२५) याच्याविरुद्ध एमपीडीए. (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस ॲक्टिव्हिटी) कायद्यानुसार प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्फतीने पोलीस अधीक्षकांनका पाठविला होता. गोंदिया येथील प्रतिबंधक सेलद्वारे तयार करून पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी प्रस्तावातील नमूद सराईत धोकादायक गुंडा इसमाविरूद्ध एमपीडीए कायद्याचे कलम ३ (१) अन्वये १४ फेब्रुवारी रोजी स्थानबद्धतेचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
लोकांमध्ये होती दहशत
आरोपी राहुल भजनदास गेडाम (२५) रा. आसोली या धोकादायक गुंडाविरूध्द हातभट्टी दारू निर्मितीचे, विक्रीचे गुन्ह्याची नोंद आहेत. त्याच्यावर वारंवार कारवाई करून सुद्धा त्याच्या चरित्रात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. त्याचे वागण्यामुळे जनसामान्य लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
काय आहे एमपीडीए कायदा?
महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृष्यश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, अवैध वाळू तस्करी करणारे, जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्तींच्या विघातक कृत्यास आळा घालण्या बाबत अधिनियम-१९८१ म्हणजेच एमपीडीए कायदा (महाराष्ट्र प्रिवेंशन ऑफ डेंजरस अँक्टिविटी) आहे. सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते.