अपघातग्रस्तांना वेळेवर योग्य उपचार मिळवून देण्याकरिता मृत्यूंजय दूत योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:21+5:302021-03-04T04:55:21+5:30
देवरी : देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाखांवर लोकांचा मृत्यू होतो. या रस्ते अपघातांचे विश्लेषण केल्यावर असे दिसून येते ...
देवरी : देशात दरवर्षी रस्ते अपघातात दीड लाखांवर लोकांचा मृत्यू होतो. या रस्ते अपघातांचे विश्लेषण केल्यावर असे दिसून येते की, अनेकदा रस्त्यावर अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत. त्यांना योग्यवेळी रुग्णालयात नेले जात नाही तसेच रुग्णालयात नेत असताना व्यवस्थित न उचलल्यामुळे जखमीच्या शरीरास अधिक त्रास होऊन यात प्राणहानीचे प्रमाणही वाढत आहे. समाजात काही चांगले लोक अपघातग्रस्तांना मदत करतात. परंतु पोलीस किंवा न्यायालयाचा ससेमिरा टाळण्यासाठी जखमींना मदत करीत नाहीत. त्याचबरोबर जखमी व्यक्ती हा अनोळखी असल्यास रुग्णालयात उपचार करण्यास वेळ लावतात. याकरिता अपघातग्रस्तांना व्यवस्थितरीत्या रुग्णालयात नेऊन त्यांना योग्य उपचार त्वरित मिळावा याकरिता शासनाने हायवे मृत्युजंय दूत ही योजना राज्यात आजपासून सुरू केली असल्याचे प्रतिपादन डोंगरगाव येथील महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर यांनी केले.
येथील आफताब मंगल कार्यालयात सोमवारी (दि.१) आयोजित मृत्युंजय योजनेच्या शुभारंभ सोहळ्यात वाहनचालक व मालकांना मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन माजी नगर उपाध्यक्ष आफताब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल ठाकरे, नर्स ज्ञानेश्वरी कोरोडे, नंदुप्रसाद शर्मा, महामार्ग सहायक पोलीस उपनिरीक्षक विलास गावंडे, पोलीस हवालदार संजय बादलवार, वासुदेव देशमुख, शिपाई मनिष बहेरीया, पुष्पराज खंडाते, नायक विजेंद्र बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविकातून गावंडे यांनी, योजनेबद्दल माहिती देत, सर्व मार्गावरील मॉल, पेट्रोलपंप, ढाबा व हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच मार्गावरील व परिसरातील गावातील ४-५ लोकांचा एक ग्रुप तयार करुन त्यांना मृत्युंजय देवदूत असे नावे द्यावे यांना जखमी व्यक्तींना कसे हाताळावे याबद्दल प्रशिक्षण देणे. १०८ किंवा इतर रुग्णालयातील रुग्णवाहिकेची माहिती या ग्रुपला देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती अपघातग्रस्त व त्यांच्या नातेवाईकांसह सर्व सबंधितांना देणे गरजेचे आहे. या योजनेत महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्र देऊन चांगले काम केल्यास यांना प्रशस्तीपत्र सुध्दा देण्यात येणार आहे आणि चांगले काम करणाऱ्या देवदूताचे नाव रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने घोषीत केलेले गुड समर्थन अवाॅर्डसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती दिली. कार्यक्रमाला देवरी-आमगाव, देवरी-साकोली व देवरी-चिचगड या मार्गावर चालणारे वाहनचालक आणि मालक बहुसंख्येत उपस्थित होते.