महावितरणने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:36+5:302021-02-25T04:36:36+5:30
आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत ...
आमगाव : आधीच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच आता महावितरणकडून शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. यामुळे शेतकरी संकटात आला असून, ही मोहीम शासनाने त्वरित थांबवावी, शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नये, असा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.
महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांसोबतच कृषिपंपाचा देखील वीज पुरवठा खंडित केला जात आहे. कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित झाल्यास सर्व शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची गंभीरपणे दखल घेऊन कृषी पंपाचे विद्युत पुरवठा खंडित करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरणकडून शेतकऱ्यांना रीडिंग न घेताच वीज बिल दिले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. याला महावितरण जबाबदार असून, कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महावितरण कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम त्वरित थांबविली नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनहित अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष भरत मडावी यांनी दिला आहे.