पहिल्याच पावसात चिखलाचे साम्राज्य
By admin | Published: July 2, 2017 12:26 AM2017-07-02T00:26:23+5:302017-07-02T00:26:23+5:30
तालुक्यातील नवेगाव येथे मुख्य रस्ता दयनीय झाला आहे. पहिल्या पावसातच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.
डांबरी रस्ता गळप : ये-जा करण्यास फजिती
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील नवेगाव येथे मुख्य रस्ता दयनीय झाला आहे. पहिल्या पावसातच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. म्हणायला रेकार्डवर असलेला डांबरी मार्ग चिखलात गळप झाला आहे.
नवेगावच्या माध्यमातून गेलेला हा मुख्य मार्ग एकीकडे बाम्हणी सोनपुरी वरुन सालेकसाला जोडणारा तर दुसरीकडे पोवारीटोला-कोटजमुरा-कावराबांध वरुन आमगावला जोडणारा आहे. त्यामुळे हा रस्ता नेहमी उपयोगात असतो व या रस्त्यावरुन लोक नेहमी ये-जा करीत असतात. त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे नवेगाव हे गाव महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर असून या मार्गावरुन मध्यप्रदेशकडे येणे-जाणे सतत सुरु असते.
लांजी (म.प्र.) व सालेकसा तालुक्याचा संपर्क याच मार्गाने मोठ्या प्रमाणावर होत असतो. एक अर्थी हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा आहे. परंतु शासन-प्रशासनाच्या दुलर्क्षितपणामुळे एवढा वाईट झाला की या रस्त्यावरुन चालताना किळस वाटते.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या आहेत. परंतु रस्त्यावरील पावसाचे पाणी नालीत जात नाही. उलट रस्त्याच्या कडेला असलेला चिखल व माती रस्त्यावर येऊन वाहते. त्यामुळे रस्त्यावर नेहमी चिखलाचे साम्राज्य माजलेले असते. रस्त्याच्या कडेला बनविण्यात आलेल्या नाल्यासुद्धा गळप झालेल्या आहेत. नाल्या बनला पण त्यांची सफाई कधीच झाली नाही. स्थानिक प्रशासन याकडे सपेशल दुर्लक्ष करीत आहे.
याच रस्त्यावर एका ठिकाणी कालव्याचा पुल उंचावलेला बनविण्यात आला. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर चिखल माती असल्यामुळे पूल ओलांडताना प्रत्येक सायकल आणि दुचाकी स्वारांना घसरुन अपघात होतो.