पालिकेच्या मोहिमेने शहरातील पशुपालक नाराज
By admin | Published: September 19, 2016 12:24 AM2016-09-19T00:24:14+5:302016-09-19T00:24:14+5:30
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे.
कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची : कोंडवाड्याचे कुलूप तोडले
गोंदिया : मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सुरू केली आहे. मात्र पालिकेच्या या मोहिमेमुळे पशुपालक नाराज असून ते पशू पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी मोकाट पशुंना बंद करून ठेवलेल्या कोंडवाड्याचे कुलूपही तोडल्याची माहिती आहे.
शहरात बघावे तेथे रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिसून येत होता. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडसर होत असून नागरिकांना वाहन चालविणे कठीण होऊ लागले होते. शिवाय रात्रीच्या वेळी विशेषत: मोकाट जनांवरांमुळे अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे जनावरांमुळे घडलेल्या अपघातांत जीवीतहानीही झाली आहे. या सर्व बाबींना लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मध्यंतरी बैठक बोलावून नगर परिषदेला मोकाट जनावरांना पकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते.
तसेच पोलीस विभागाकडूनही नगर परिषदेला मोकाट जनावरांची व्यवस्था करण्यासंदर्भात पत्र देण्यात आले होते. या सर्व बाबींना गांभीर्याने घेत नगर परिषदेने शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सुरू केली आहे. नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे सध्या प्रायोगीक तत्वावर कंत्राटी पद्धतीवर २९ आॅगस्ट पासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून यासाठी एक विशेष वाहन कार्यरत आहे. या वाहनात मोकाट जनावरे पकडून त्यांना नगर परिषदेच्या बाजूला जुन्या अग्निशमन कार्यालयात सोडले जात आहे.
पालिकेच्या या मोहिमेचे शहरवासीयांकडून कौतूक केले जात आहे. मात्र पशुपालकांत या मोहिमेने रोष व्याप्त आहे. पशुंना पकडण्यात येत असल्याने हे पशुपालक आता भांडणावर उतरले असल्याचीही माहिती आहे. शिवाय ते पशु पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची करीत असल्याचेही कळले. तर दोन दिवसांपूर्वी पशुंना कोंडून ठेवण्यात येत असलेल्या कोंडवाड्याचे कुलूप तोडण्यात आल्याचा प्रकारही घडल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे पशू पकडणारे कर्मचारी दहशतीत वावरत आहेत.
फाडली जाते ३०० रूपयांची पावती
पशुंना पकडण्यात आल्यानंतर त्यांना सोडण्यासाठी नगर परिषदेकडून ३०० रूपयांची पावती फाडली जात आहे. पावती फाडल्यानंतरच पशुला सोडले जात आहे. पैसे लागत असल्यामुळेच पशुपालक संतापले आहेत. आतापर्यंत पशु मोकाट फिरत होते याची त्यांना चिंता नव्हती. मात्र आता पशुंना सोडविण्यासाठी पैसे लागत असल्याने ते भांडणावर आले आहेत.
पशुपालकांच्या सहकार्याची गरज
मोकाट पशुंमुळे होत असलेले अपघात टाळण्यासाठी व वाहतुकीची अडसर दूर करण्यासाठी पालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे अपघातांत एखादा मनुष्य जखमी होऊन जीवीतहानीची शक्यता टाळता येत नाही. तर दुसरीकडे पशुंच्या जीवावरही बेतणार असल्याची शक्यता टाळता येत नाही. यासाठी पशु पकडणे सुरू आहे. त्यामुळे पशुपालकांनी पालिकेला सहकार्य करण्याची गरज आहे.