मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:55 AM2021-02-28T04:55:47+5:302021-02-28T04:55:47+5:30
गोंदिया : काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ...
गोंदिया : काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर नगर परिषद कर्मचारी व पोलीस दंडात्मक कारवाई करून मास्कचा वापर करण्याचा सल्ला देत आहेत, पण हा सल्ला आणि नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याचा विसर पडला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी एक नियम आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी वेगळा नियम का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
मागील आठ ते दहा दिवसांपासून विनामास्क वावरणाऱ्यांवर नगर परिषद कर्मचारी आणि पोलीस दंडात्मक कारवाई करीत आहेत. शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य मार्गावर हे कर्मचारी तैनात आहेत. मागील आठ दिवसांत त्यांनी ८७६ लोकांवर दंडात्मक कारवाई ८७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई योग्य नसून स्वागतार्ह आहे. कोरोना नियमांचे पालन आणि शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केली जात आहे, पण कारवाई करणाऱ्यांनीसुध्दा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नगर परिषदेचे कर्मचारी विनामास्क कार्यालयात वावरतात. त्यामुळे त्यांनीसुध्दा नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. तर ही बाब पोलिसांनादेखील लागू होते. एखादा दुचाकीचालक विनामास्क दिसला की, लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते. पण विना मास्क वावरणाऱ्या पोलिसांवर कारवाई करणार कोण, हा प्रश्न देखील कायम आहे.
.......
८७ हजार रुपयांचा दंड वसूल
केलेल्या कारवाई
८७६
......
४० टक्के कर्मचारी विनामास्क
गोंदिया नगर परिषदेला शुक्रवारी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली असता मालमत्ता कर, बांधकाम, नगर रचना, अकाऊंट विभागातील अनेक कर्मचारी विनामास्क वावरताना आढळले. उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी ४० टक्के कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोरोनाचे गांभीर्य अद्यापही कळले नसून यांना शिस्त लावणार कोण, असा प्रश्न सवाल उपस्थित केला जात आहे.
.....
कोट
नगर परिषदेत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात व कार्यालयाबाहेरसुध्दा नियमित मास्क वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच यानंतरही जर कर्मचारी मास्क लावत नसतील तर त्यांच्यावर सुध्दा निश्चितच दंडात्मक कारवाई करण्यात येईल. नियम सर्वांसाठीच सारखेच आहेत.
- करण चव्हाण, मुख्याधिकारी नगर परिषद गोंदिया.