नगर परिषदेचे पथक होणार ‘ॲक्टिव्हेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:40+5:302021-03-20T04:27:40+5:30
गोंदिया : दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना बाधितांची व बिघडत चाललेली परिस्थिती बघता नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाविषयक उपाययोजनांची ...
गोंदिया : दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना बाधितांची व बिघडत चाललेली परिस्थिती बघता नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाविषयक उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी आता नगर परिषदेचे पथक पुन्हा ‘ॲक्टिव्हेट’ केले जाणार आहे. यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून नगर परिषदेने तयारी केली असून, हे पथक अवघ्या शहरांतील हालचालींवर लक्ष ठेवणार आहे.
मागील वर्षी कहर केेलेल्या कोरोनाचा मध्यंतरी प्रादुर्भाव कमी झाला होता. अशात नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपल्याचा आव आणून हलगर्जीपणाची वागणूक सुरू केली. कोरोनाविषयक उपाययोजनांना बगल देत मास्कला बाजूला टाकून गर्दी करण्यास सुरूवात केली. परिणामी कोरोनाने आता पुन्हा आपले पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशात याला वेळीच आवर घालण्यासाठी नागरिकांची होणारी गर्दी टाळणे गरजेचे असून, सोबतच कोरोना विषयक उपाययोजनांचे पालन हाच यावर तोडगा आहे. मात्र, नागरिकांना सांगूनही ते ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. अशात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निर्देशावरून नगर परिषदेने गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर तसेच कोरोना विषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवून कारवाई करण्यासाठी पथक ‘ॲक्टिव्हेट’ केले आहे. मागील वर्षी नगर परिषदेचे पथक अशांवर कारवाया करीत असल्याने त्यांचे चांगले परिणाम दिसून आले होते. याकडे लक्ष देत आता पुन्हा पथक गठीत करून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
---------------------------
दंडात्मक कारवाई तसेच सीलींगचे अधिकार
शहरात गर्दी होत असलेल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर जसे, मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स, मॉल्स आदींवर हे पथक नजर ठेवणार आहेत. यासाठी सुमारे १९ पथकांचे गठन करण्यात आले आहे. या पथकांना वेगवेगळे क्षेत्र ठरवून देण्यात आले असून, त्यानुसार त्यांना तेथे वेळोवेळी अचानक भेट द्यायची आहे. तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच सीलींगचे अधिकार या पथकांना देण्यात आले आहेत. नगर परिषदेचे हे पथक शनिवारपासूनच (दि. २०) आपल्या कामाला लागणार असल्याची माहिती आहे.