एकाने आवळला गळा, दुसऱ्याने मानेवर मारली कैची
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 10:39 AM2023-03-25T10:39:11+5:302023-03-25T10:42:18+5:30
संदीपच्या मारेकऱ्यांची कबुली : गुन्ह्यात वापरलेले वाहन व कैची जप्त
गोंदिया : कौटुंबिक वादातून हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वनविभागाच्या मोकळ्या जागेत चांदनीटोला (नागरा) येथील संदीप भाऊलाल चिखलोंडे (२९) याचा खून करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. तिसरा आरोपी फरार आहे. या प्रकरणातील आरोपींनी दारू पिण्याचे कारण सांगून संदीपला मोटारसायकलवर हिवरा परिसरात आणून त्याचा खून केला होता.
आरोपी जितेंद्र धनलाल ठाकरे (२५), रा. जब्बारटोला, विनोद नेतलाल ठाकरे (३०), रा. सावरी व कमल योगराज ठकरेले (२५), रा. सावरी या तिघांनी संदीप चिखलोंडे याच्यासोबत रतनारा येथे मद्य प्राशन केले. परंतु, ती दारू त्यांना कमी वाटल्याने पुन्हा अधिक दारू ढोसण्याचे कारण पुढे करून संदीपला मोटारसायकलवर तिघांनीही हिवरा परिसरात आणले. त्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कैची व मोटारसायकल रामनगर पोलिसांनी जप्त केली आहे, अशी माहिती ठाणेदार संदेश केंजळे यांनी दिली.
‘नाइंटी’ने वाढविला आत्मविश्वास अन् केला घात
रतनारा येथील लग्नाच्या आशीर्वाद समारोहात दारू प्याली. परंतु, त्या दारूतून संदीप व आरोपींचे समाधान झाले नाही. पुन्हा दारू पिण्याचे कारण पुढे करून आरोपींनी संदीपला मोटारसायकलवर बसवून हिवरा परिसरात आणले. तरीही त्याचा खून करण्याची हिंमत या आरोपींची झाली नसावी. यासाठी त्यांनी या ठिकाणी ९० मिली (नाइंटी) दारूचा पॅक पोटात टाकल्यावर एकाने गमछ्याने त्याचा गळा आवळला. परंतु, त्याने स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्याने कैचीने त्याच्या मानेवर मारून खून केला. नंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकविल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.
आरोपींना आज करणार न्यायालयात हजर
संदीप चिखलोंडे याचा खून करणाऱ्या आरोपीत जितेंद्र धनलाल ठाकरे (२५), रा. जब्बारटोला व विनोद नेतलाल ठाकरे (३०), रा. सावरी यांना अटक करण्यात आली, तर तिसरा आरोपी कमल योगराज ठकरेले (२५), रा. सावरी हा फरार आहे. त्या दोन आरोपींना न्यायालयाने २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्या आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयात २५ मार्च रोजी हजर केले जाणार आहे.