अनैतिक संबंधातून विवाहित तरुणाचा खून; कमरेला दगड बांधून मृतदेह फेकला नाल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 05:39 PM2022-09-20T17:39:54+5:302022-09-20T17:42:59+5:30
एलसीबीने केले तिघांना अटक
गोंदिया : अनैतिक संबंधातून देवरी तालुक्याच्या तुमडीमेंढा येथील दिलीप संतराम अरकरा (३५) या विवाहित तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना सोमवारी (दि.१९) अटक करून चिचगड पोलिसांच्या स्वाधीन केले.
दिलीप संतराम अरकरा (३५) याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आरोपी रतिराम दशरथ कुंभरे याने आरोपी छेदीलाल कारुजी आचले व मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा यांच्या मदतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार केले. मृतदेह कुणालाही दिसू नये म्हणून मृतदेहाच्या कमरेला दगड बांधून मृतदेह नाल्याच्या पाण्यात फेकून दिला. यासंदर्भात मृतकाची पत्नी पुष्पा दिलीप अरकरा (२६) यांनी १७ सप्टेंबर रोजी चिचगड पोलिसांत तक्रार केली.
दरम्यान दिलीप अरकरा याचा मृतदेह तुमडीमेंढा शेतशिवाराजवळील जंगलातील नाल्याजवळ आढळला. या घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखा व चिचगड पोलिसांनी करून अवघ्या चार तासांच्या आरोपी रतिराम दशरथ कुंभरे, छेदीलाल कारुजी आचले व मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा या तीन आरोपींना अटक केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, चिचगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे यांनी केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील करीत आहेत.