आईच्या प्रियकराचा काठीने मारून खून; अनैतिक संबधाला कंटाळून त्याने केला खून
By नरेश रहिले | Published: July 2, 2023 06:27 PM2023-07-02T18:27:31+5:302023-07-02T18:27:47+5:30
विधवा महिलेशी चार वर्षापासून अनैतिक संबध ठेवणाऱ्या गवंडी काम करणाऱ्या मिस्त्रीचा एका १६ वर्षाच्या मुलाने काठीने मारून खून केला.
गोंदिया : विधवा महिलेशी चार वर्षापासून अनैतिक संबध ठेवणाऱ्या गवंडी काम करणाऱ्या मिस्त्रीचा एका १६ वर्षाच्या मुलाने काठीने मारून खून केल्याची घटना १ जुलैच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास गोंदिया तालुक्याच्या बघोली येथे घडली. सुनील देवदास बांते (४०) रा. चांदोरी खुर्द असे मृताचे नाव आहे. त्याचा खून करणारा विधीसंर्षीत बालक हा १६ वर्षाचा आहे.
दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदोरी खुर्द येथील सुनील बांते (४०) हा आपल्या सोबत गवंडी कामावर बघोली येथील एका विधवा महिलेला नेत होता. ती विधवा असल्याने कामावरच या दोघांचे सूत जुळले. मृतक त्या महिलेलच्या घरी जात असल्याने ही बाब तिच्या मुलाला खटकत होती. यातूनच त्याने सुनील बांतेच्या डोक्यावर काठीने वार करून त्याचा खून केला. सुनील बांते हा नेहमी प्रमाणे १ जुलै रोजी कामावरून आल्यावर आपल्या घरी गेला. हातपाय धुतल्यावर तयार होऊन नेहमीप्रमाणे बघोली येथे गेला. बघोली येथे खूप दारू पिऊन तो चौकात बसून होता.
इकडे-तिकडे फिरल्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास तो घरी जायला निघाला. परंतु तो चांदोरी खुर्द गावाच्या २०० मीटर अंतरावरच त्याच्या डोक्यावर काठीने वार करून १६ वर्षाच्या बालकाने त्याचा खून केला. त्याच्या मृतदेहाच्या १ मीटर अंतरावर त्याची सायकल पडलेली होती. डोक्यावर जखमा होत्या. दवनीवाडा पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सुकदेव राऊत, पोलीस शिपाई टेभेंकर, धनेश्वर पिपरेवार, हर्षे व गोंदियावरून श्वान पथक बोलविण्यात आले. त्या बालकाला ताब्यात घेतल्यावर त्याने या कृत्याची कबुली दिली. त्याच्याविरूध्द दवनीवाडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार वर्षापासून होते अनैतिक संबध
मृतक सुनील बांते याचे विधीसंघर्षीत बालकाच्या आईसोबत मागील चार वर्षापासून अनैतिक संबध होते. मुलगा वयात येत असताना त्याला या सर्व गोष्टी समजू लागल्याने त्याने विरोध करण्याच्या आधीच खून करून त्याची कटकट संपविली. आपल्यासोबत तिला गवंडी कामावर घेऊन जात असतांना त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.
महिनाभरापूर्वी दिली होती तंबी
मृतक हा विधवा महिलेकडे नेहमीच जात असल्याने तू येऊ नको अशी तंबी त्या विधी संघर्षीत बालकाने मृतकाला महिनाभरापूर्वी दिली होती. परंतु मृतकाने त्याच्या धमकीला न जुमानता आपला प्रयोग सुरूच ठेवला होता. यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जाते.
तासभरात आरोपीला अटक
दवनीवाडा पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरविली. त्यानंतर गावातून माहिती घेतल्यानंतर त्यांना धक्कादायक माहिती हाती लागली. माहितीच्या आधारावर याप्रकरणाचा छडा लावीत पोलिसांनी आरोपीला तासाभरातच अटक केली.