दुचाकी चोरली म्हणून राजेश किरसानचा केला खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:36 AM2021-07-07T04:36:26+5:302021-07-07T04:36:26+5:30
गोंदिया : तालुक्यातील लोहारा येथील राजेश किरसान (३४) या इसमाला मोटारसायकल चोरी करताना पकडल्याने गावातील १० ते १२ लोकांनी ...
गोंदिया : तालुक्यातील लोहारा येथील राजेश किरसान (३४) या इसमाला मोटारसायकल चोरी करताना पकडल्याने गावातील १० ते १२ लोकांनी बेदम मारहाण करीत गावात त्याची धिंड काढली. त्यानंतर बेशुध्द झालेल्या राजेशला एका तवेरा गाडीच्या डिक्कीत टाकून दवनीवाडा पोलिस ठाण्यात नेले. परंतु पोलिसांनी आधी मेडिकल करून आणा तरच अटक करू, असे त्याला घेऊन आलेल्या लोकांना सांगितले. परंतु मंगळवारी (दि. ६) सौंदड परिसरात राजेश किरसानचा मृतदेह आढळल्याने या प्रकरणाला आता नवीनच वळण मिळाले आहे.
गोंदिया तालुक्यातील लोहारा येथील राजेश किरसान (३४) हा मोटारसायकल, सायकल व गावातील छोटे-मोठे साहित्य चोरायचा. त्याने २३ जून रोजी गावातील एका घरून मोटारसायकल चोरल्याने गावकऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले. त्याला त्यावेळी बेदम मारहाण केली. मारहाण करीत त्याची गावात धिंड काढली. बेदम मारहाणीमुळे बेशुध्द झालेल्या राजेशला पोलिसांच्या हवाली करण्यासाठी तवेरा या वाहनाच्या डिक्कीत टाकून दवनीवाडा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्याचे आधी मेडिकल करून आणा तरच अटक करू असे सांगून त्याला आणले होते, अशी नाेंद दवनीवाडा पोलिसांनी घेतली. मेडिकल करण्यासाठी त्याच वाहनातून राजेशला घेऊन गेले परंतु परत आलेच नाहीत. ६ जुलै रोजी तब्बल १४ दिवसांनी राजेशचा मृतदेह सौंदड परिसरात आढळला. त्या मृतदेहाची जागीच उत्तरीय तपासणी व्हावी असा पोलिसांचा आग्रह होता. परंतु डॉक्टरांनी तो मृतदेह मेडिकल कॉलेजला आणण्याचा सल्ला दिल्यामुळे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात गोंदियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये उत्तरीय तपासणी करण्यात आली. मेडिकल कॉलेजला छावणीचे रूप आले होते.
..............................
आमगावची पुनरावृत्ती होऊ नये याची पोलिसांना धास्ती
लोहारा येथील आठ ते दहा नागरिकांनी राजेशला मारहाण केल्यानंतर त्याला बेशुध्द अवस्थेत दवनीवाडा पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता पोलिसांनी तो मेलाच असेल किंवा कधीही मरू शकते म्हणून आपण संकटात येऊ नये यासाठी त्याला घेऊन येणाऱ्यांच तुम्हीच मेडिकल करून आणा, असे सांगून पोलिसांनी धन्यता मानली.
..................................
कॉंग्रेस जिल्हा अध्यक्षांनाही खोटा दिलासा
राजेश किरसान प्रकरणात दवनीवाडा पोलिसांना विचारणा करण्यासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष एन.डी. किरसान गेले असताना दवनीवाडा पोलिसांनी त्यांनाही खोटा दिलासा देऊन परत पाठविले. तो मरणार नाही, जिवंतच आहे, असा दावा ठाणेदार उरकुडे करीत होते.
................
आईला पाणी पाजू दिले नाही
राजेश किरसानला लोहारा येथे बेदम मारहाण केल्यानंतर तो बेशुध्द झाला. त्या बेशुध्द मुलाला पाणी पाजण्यासाठी त्याची म्हातारी आई पाण्याची बॉटल घेऊन गेली असताना आरोपींनी तिच्या हातातील बॉटलला लाथ मारून फेकले तरीही दवनीवाडा पोलिसांनी त्यांचे ऐकून घेतले नाही.
........................
पोलिसांनी डायरीत घेतली होती नोंद
राजेश किरसानला बेदम मारहाण केल्यानंतर बेशुध्द अवस्थेत दवनीवाडा पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी दवनीवाडा पोलिसांनी डायरीत याची नोंद घेतल्याचे ठाणेदार उरकुडे म्हणाले. परंतु आमगाव प्रकरणासारखे हे प्रकरण होऊ नये म्हणून मेडिकल केल्यानंतरच अटक करू, असे त्यांनी त्याला घेऊन आलेल्या लोकांना सांगितले.
.....................
ठाणेदार म्हणत, तो जिवंतच आहे
या प्रकरणाला घेऊन ठाणेदार उरकुडे यांना किरसान कुटुंबीय वारंवार विचारणा करीत असताना तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याने चोरी व खुनाच्या प्रयत्नासारखे काम केले आहे. तो मरणार नाही, तो फरार झाला आहे, आम्ही दोन दिवसात त्याला अटक करू, असे ठाणेदार विचारणाऱ्या लोकांना व पीडिताच्या कुटुंबीयांना सांगत होते.