महिलेच्या हत्येचे गूढ कायम
By admin | Published: July 11, 2015 02:06 AM2015-07-11T02:06:48+5:302015-07-11T02:06:48+5:30
येथील गजबजलेल्या कापगते वसाहतीत एका व्यापाऱ्याच्या घरी लुटमार करून पत्नीची दुपारी भरदिवसा हत्या झाली.
पोलिसांपुढे तपासाचे आव्हान : नगरात कडकडीत बंद
अर्जुनी-मोरगाव : येथील गजबजलेल्या कापगते वसाहतीत एका व्यापाऱ्याच्या घरी लुटमार करून पत्नीची दुपारी भरदिवसा हत्या झाली. या हत्येचे रहस्य अद्यापही कायम आहे. शुक्रवारी (दि.१०) सकाळी ग्रामीण रुग्णालयात शवचिकित्सा केल्यानंतर दुपारी सुमारे १२ वाजता स्थानिक स्मशानघाटावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान नगरात शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. या हत्येचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दुपारी येथील नितू सुरेश पशिने (४५) या महिलेची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मारेकरी पसार झाले. मात्र नेमकी हत्या कोणत्या कारणावरून झाली या बाबीचा उलगडा होऊ शकला नाही. नेमके पैसे किती चोरीला गेले याची माहिती उघड झाली नाही. मृतक या एक दिवसांपूर्वी बँकेत गेल्या होत्या मात्र त्यांनी बँकेतून पैसे काढले नाही. घरात असलेले पैसे चोरीला गेल्याचे समजते.
मृतक महिला बँकेत नेमकी कशासाठी गेली होती ते कळू शकले नाही. हत्येनंतरही महिलेच्या अंगावरील दागिने मात्र जैसे थे होते. पोलिसांनी मृतकाचे पती सुरेश यांची यासंदर्भात विचारपूस केली. ते अद्यापही यातून सावरले नाहीत. नेमके काय चोरीला गेले याची त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे हत्येचे कारण नेमके लुटमार आहे की अन्य काही याबाबत संभ्रम कायम आहे.
शुक्रवारी सकाळी इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यापारी संघटनेतर्फे बंद पुकारण्यात आला होता. नगरातील शाळा, व्यापाराी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. मारेकऱ्यांचा त्वरित शोध लावावा या मागणीचे व्यापारी संघटनेतर्फे निवेदन तहसीलदार रहांगडाले व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांना देण्यात आले. त्यांनी लवकरच या प्रकरणी आरोपींना गजाआड करण्याचे आश्वासन दिले. ठाणेदार अभिषेक पाटील, सहा. पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, उपनिरीक्षक रत्नदीप साळुंके तपास करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)