मूशानझोरवा विकासापासून कोसो दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 06:00 AM2020-03-09T06:00:00+5:302020-03-09T06:00:11+5:30
मूशानझोरवा हे गाव खडकी-टोला गावापासून २ किमी. अंतरवर आहे. या गाव परिसरात अस्वल, बिबट, रानगवा, तडस आदी प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. जंगल व्याप्त रस्ता असल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात ५ वर्षां खालील १० बालके असून त्यांना शासनाचे बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरविला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र उघडण्याची नितांत गरज आहे.
राजेश मुनिश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : तालुक्यातील काही गावे आजही विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ६ वरील पूर्वेस ६ किलामीटर अंतरावर असलेल्या मुशानझोरवा गावाचा आजही विकास झाल्याचे दिसून येत नाही.
तालुक्यातील खडकी ग्रामपंचायत अंतर्गत डोंगरगाव-डेपो, खडकी, खडकी-टोला व मुशानझोरवा या गावांची गट ग्रामपंचायत खडकी आहे. मुशनझोरवा हे आदिवासी बहूल गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाची लोकसंख्या ४६ असून भलावी, मडावी, वरखडे, परतेकी हे गोंड समाजाचे लोक एकोप्याने राहतात. गावाला लागूनच नवेगाव- नागझिरा अभयारण्य आहे.
गोंड समाजाचे लोक शेती करून आपली उपजीविका चालवितात. मात्र रोजगारासाठी त्यांना इतरत्र भटकावे लागत आहे. शेती आहे पण रानटी प्राण्यांच्या उपद्व्यापामुळे पिकाची चांगलीच नासाडी करतात.
मूशानझोरवा हे गाव खडकी-टोला गावापासून २ किमी. अंतरवर आहे. या गाव परिसरात अस्वल, बिबट, रानगवा, तडस आदी प्राण्यांचा नेहमीच वावर असतो. जंगल व्याप्त रस्ता असल्यामुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. गावात ५ वर्षां खालील १० बालके असून त्यांना शासनाचे बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरविला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी केंद्र उघडण्याची नितांत गरज आहे. गावात शाळा नसल्यामुळे ५ वर्षांपेक्षा मोठ्या बालकांना शिक्षण घेण्यासाठी खडकी गावात पायी जावे लागते. शासकीय-निमशासकीय कामांसाठी व बाजारानिमित्त सडक-अर्जुनी येथे १५ किलोमीटर यावे लागते. त्यात बस सुविधा नसल्याने जास्तच त्रास सहन करावा लागतो. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दर्शन होत नसल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या मूशानझोरवा गावात कोणताही मोठा अधिकारी आजपर्यंत कधीच गेला नाही, हे विशेष. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसून जंगलातून वाट शोधत मूशानझोरवा गावाकडे नागरिकांना वाट शोधत जावे लागते. विशेष म्हणजे, रात्रीच्यावेळी त्यांची पाळीव कुत्री सोबतीला असतात.
गाव जंगलात असल्यामुळे वन्यप्राण्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त बळावली आहे. त्यासाठी वन्य जीव विभागाने प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावाचे बाहेर तारांची सुरक्षा भिंत करण्याची नितांत गरज आहे.
मूशानझोरवा गावची लोकसंख्या फारच कमी असल्यामुळे तिथे मिनी अंगणवाडी केंद्र देण्यासंबंधी माहिती शासनाकडे पाठविली आहे.
-प्रकाश मेंढे
बाल विकास प्रकल्प अधिकारी,
पंचायत समिती, सडक अर्जुनी