मुस्लीम महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:17 AM2018-03-28T00:17:39+5:302018-03-28T00:17:39+5:30
लोकसभेत पारित करण्यात आलेले ‘तीन तलाक’ चे बिल रद्द करण्यात यावे, सरकारने मुस्लीमांच्या शरीयतवर हल्ला करु नये, या मागण्यांना घेवून जिल्ह्यातील शेकडो मुस्लीम महिलांनी मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभेत पारित करण्यात आलेले ‘तीन तलाक’ चे बिल रद्द करण्यात यावे, सरकारने मुस्लीमांच्या शरीयतवर हल्ला करु नये, या मागण्यांना घेवून जिल्ह्यातील शेकडो मुस्लीम महिलांनी मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.विविध मागण्यांचे निवेदन राष्टपती व पंतप्रधान यांच्या नावे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना दिले.
लोकसभेच्या सन २०१७ मधील सत्रात ‘तीन तलाक’ बिल पारित करण्यात आले होते. मात्र हे बिल मुस्लीम कायद्याच्या (शरीयत) विरोधात असून भारतीय संविधानातील कलमांच्या विरूद्ध आहे. यामुळे मान, सन्मान व समानतेसह नैतीक कक्षात महिलांच्या स्वातंत्र्याचे हनन होत आहे. एवढेच नव्हे तर आॅल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड १९३२ च्या कामात प्रत्यक्ष रूपात हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला आहे. या बिलामुळे मुस्लीम समाजातील महिला व पुरूषांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे ‘तीन तलाक’ बिलाचा विरोध व निषेध व्यक्त करीत हे बिल त्वरीत रद्द करण्याची मागणी येथील मुस्लीम महिला संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सरकारकडून शरीयतमध्ये केली जात असलेली ढवळाढवळ आणि हल्ला थांबविण्यासाठी मुस्लीम समाजातील महिलांनी एकत्र येण्याची गरज आहे. सरकारचा विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे संघटनेच्या महिलांनी सांगितले. शहरातील रामनगर चौकातून दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर हा मोर्चा दुर्गाचौक, नेहरु चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहचला. उपविभागीय कार्यालयासमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मुस्लीम संघटनेच्या नेत्यांनी मोर्चात सहभागी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संकल्प केला. या मोर्च्यात जिल्हाभरातील महिला सहभागी झाल्या होत्या. मुस्लीम समाजातील महिलांनी काढलेला हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा असल्याची चर्चा शहरवासीयांमध्ये होती.
महिला उतरल्या रस्त्यावर
मुस्लीम महिला संघटनेने काढलेल्या मोर्चात शेकडो महिला ‘तीन तलाक’ बिल रद्द करण्याच्या मागणीचे फलक हातात घेऊन सहभागी झाल्या. संघटनेच्या महिलांनी उपस्थित अन्य महिलांना ‘तीन तलाक’ बिल काय आहे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पश्चात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना संघटनेच्या अध्यक्ष अफसाना शेख, उपाध्यक्ष सायरा शेख, रेहाना अली, सचिव सानिया खान, शहनाज शेख, आशिया जाकीर, शमापरवीन शेख, रूबिना शेख, मुमताज शेख, समीम कमरअली, राबीया शेख, जैबून बीबीजी, रिजवाना खान यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या.