लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...! (डमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:34+5:302021-05-16T04:28:34+5:30
गोंदिया : कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हाबंदी आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये ...
गोंदिया : कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी, जिल्हाबंदी आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये असे फर्मान काढण्यात आले. त्यामुळे सुहासिनींना माहेरी जाता आले नाही. लॉकडाऊन कालावधीतही लग्नसोहळे पार पडत आहेत. एकदा लग्न लावून गेलेली मुलगी परतीला न येता सासरी रममाण होण्याची पाळी आली आहे. लग्न झाल्यावर मुली किमान दोन ते तीनवेळा माहेरी येत असतात. मात्र, जिल्हाबंदी असल्याने त्यांना येणे शक्य नाही. उन्हाळी सुटीत मुलांना शाळा नसते. अशात चार दिवस माहेरी जाऊन तेथील वातावरणात रममाण होण्याची मनोमन इच्छा सुहासिनींना असते. मात्र, कोरोनाने माहेरची वाट दूर गेली आहे. सध्या विवाहित मुली आपल्या माहेरातील आई, वडील व इतर मंडळींशी मोबाइलने आभासी भेट घडवून आणतात. यात कधी व्हिडिओ कॉल करून माहेरातील आठवणीला उजाळा देत आहेत. प्रत्येक विवाहित मुलीला आपल्या माहेरची आठवण येणे साहजिकच आहे. माहेरी होणाऱ्या आप्तस्वकीयांच्या लग्नसोहळ्यातही उपस्थिती दर्शविणे कठीण झाले आहे. तसेच अंत्यविधीसाठीसुद्धा उपस्थितीची अट घालून दिली आहे. त्यामुळे अंत्यविधीसाठी जाणे अवघड जात आहे.
....................
माझ माहेर माहेर
- कोरोनाच्या संसर्गामुळे आपल्याला व माहेरच्यांना धोका होऊ नये म्हणून कोरोनाच्या भीतीमुळे मागील वर्षापासून माहेरी गेली नाही. माहेरच्यांची आठवण आली की फोन करून विचारपूस करते. जास्तच आठवण आली तर व्हिडिओ कॉल करून संवाद साधते. माहेरी कधी जायला मिळेल असे वाटत आहे.
पूजा अतुल फुंडे, विवाहित महिला
...........
कोरोनाचा संसर्ग सगळीकडेच असल्याने माहेरी गेल्यास प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला किंवा आपण माहेरी गेल्यानंतर स्वकीयांसोबत होणाऱ्या भेटीगाठीच्या माध्यमातून कोरोना होऊ नये म्हणून मी माहेरी गेलीच नाही. माहेरच्या लोकांची आठवण आल्यास त्यांच्याशी फक्त फोनवर बोलूनच समाधान मानावे लागते.
- निर्मला निलकंठ भुते, विवाहिता, शिवणी
.....................
माहेरची आठवण येते परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून मनोमन इच्छा असूनही माहेरला जाता आले नाही. कोरोनामुळे बस बंद आहेत. घरचे लोक बाहेर जाण्यास मनाई करतात. त्यामुळे आपले घराबाहेर पडणे धोक्याचे असेल तर माहेरही हुकले. माहेरच्यांची आठवण आली की आम्ही फोन करतो आणि फोनवरूनच समाधान मानावे लागते.
हंसकला चुटे, विवाहिता, पदमपूर
..........
लागली लेकीची ओढ
माझी मुलगी वर्षभरापासून आली नाही. कोरोनाचा कहर सुरूच असल्याने आज येईल, उद्या येईल असे मला वाटते. परंतु माझी लेक सव्वा वर्षापासून माझ्या घरी आली नाही. वर्षभरात होणाऱ्या अनेक कार्यक्रमाला आपली मुलगी येईल असे मला वाटत होते, परंतु कोरोनामुळे ती येऊ शकली नाही. तिची खूप आठवण येते.
- विठाबाई शिवणकर, आई पदमपूर
......
माझी मुलगी दीड वर्षापासून घरी आली नाही. तिला कधी भेटू आणि कधी नाही असे झाले आहे. आता येते की थोड्या वेळात माझ्यासमोर येते असे झाले आहे. कोरोनामुळे तिला येता येत नाही किंवा आम्हालाही तिच्याकडे जाता येत नाही. कोरोना लवकर कमी व्हावा आणि माझ्या लेकीशी माझी भेट व्हावी, असे मला वाटते.
- द्वारकाबाई चिंचाळकर, आई आमगाव
.......
माझ्या लेकी खूप दिवसापासून मला भेटल्या नाहीत. त्यांची आठवण आली की फोन करून त्यांचा हालचाल विचारत असते. परंतु आधी सर्व मुली एकाचवेळी घरात आल्या तर आनंद होत होता. मागील दीड वर्षापासून एकत्र येऊ शकले नाही. कोरोनामुळे फक्त फोनवरच बोलून बसावे लागते
-सरिता रमेश खोटेले, आई, आदर्श कोहळीटोला
..............................................
मामाच्या गावाला कधी जायला मिळणार
- कोरोनामुळे आईबाबा घराबाहेर निघू देत नाही, त्यात मामाच्या गावाला कसे जाणार. वर्ष दीडवर्षापासून मी मामाच्या गावाला गेलो नाही. आधी शाळा सुरू असायच्या तर वेळ मिळत नव्हती आता वेळ असूनही मामाच्या गावी जाता येत नाही.
- पार्थ खोटेले, सडक-अर्जुनी
.........
शाळा सुरू असल्यावर वेळ मिळत नाही. आता वेळ भरपूर आहे, पण मामाच्या गावी जायला मिळत नाही. मामा-मामीची खूप आठवण आली. मामाचे मूल- मुली त्यांच्यासोबत खेळायला खूप आवडते, पण मामाच्या गावी कोराेनामुळे कुणी जाऊच देत नाही.
- नंदिता पाऊझगडे, किडंगीपार
.............
मामाचे गाव खूप दूर आहे. दरवर्षी आम्ही उन्हाळ्यात मामाच्या गावाला जात होतो. पण दोन उन्हाळे होऊनही आम्हाला मामाच्या गावी जाता येत नाही. उन्हाळा आला की कोरोना-कोरोना ओरडून आम्हाला खेळायलाही जाऊ देत नाही. मामाच्या गावाला दीडवर्षापासून गेलोच नाही.
- अक्षय काकडे, आमगाव