म्युकरमायकोसिसने घेतला जिल्ह्यातील पाच जणांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:20 AM2021-06-11T04:20:36+5:302021-06-11T04:20:36+5:30
गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत २० हजार रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात ...
गोंदिया : कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचे आरोग्य विभागातर्फे सर्वेक्षण केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत २० हजार रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यात ४४ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तीन रुग्णांचा नागपूर, तर दोन रुग्णांचा गोंदिया येथे मृत्यू झाला आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. स्टेरॉइडचा अतिरिक्त वापर, जास्त काळ आयसीयूमध्ये वास्तव्यास असलेले रुग्ण, मधुमेह रुग्ण, ऑक्सिजनचा वापर करताना न घेतलेली योग्य काळजी, स्वत:च्या मनाने स्टेरॉइडचे प्रमाण अधिक असलेल्या औषधांचे सेवन या कारणामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांभोवती म्युकरमायकोसिस या आजाराचा विळखा वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या आजाराच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळेच या आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेता आरोग्य विभागाने कोराेनामुक्त झालेल्या रुग्णांचे म्युकरमायकोसिसच्या आनुषंगाने सर्वेक्षण आणि आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात आतापर्यंत ४०,९४७ कोरोनाबाधित आढळले असून ४०,००६ बाधितांनी यावर मात केली आहे. यापैकी आतापर्यंत २० हजार कोरोनामुक्त झालेल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४४ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले, तर ३० संशयित रुग्ण आढळले आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर त्वरित शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. यापैकी आतापर्यंत १७ रुग्णांवर गोंदिया व नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, तर १४ रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे. म्युकरमायकोसिसने गोंदिया जिल्ह्यातील आतापर्यंत पाच रुग्ण दगावले असून, यापैकी तीन रुग्ण नागपूर येथे, तर दोन रुग्ण गोंदिया येथेच उपचारापूर्वीच दगावल्याची माहिती आहे.
..............
टास्क फोर्सकडून नियमित आढावा
म्युकरमायकोसिसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व वेळीच रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नेत्ररोग आणि शासकीय व खासगी ईएनटी तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्यांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. या टास्क फोर्सची दर आठवड्याला बैठक घेतली जात असून, त्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा सातत्याने आढावा घेऊन उपाययोजना केल्या जात आहे.
...................
एम्फोटिरिसिन बी इंजेक्शनचा पुरेसासाठा
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा जिल्ह्यात व राज्यात सुद्धा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत होती. मात्र शासनाकडून आता या इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात पुरवठा केला जात आहे. त्यामुळे रुग्णांची अडचण दूर झाली आहे. शिवाय या आजाराचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सुद्धा समावेश केल्याने दिलासा मिळाला आहे.
.......
ओठ, नाक, जबड्याला
लक्षणे दिसताच घ्या वेळीच काळजी
म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार असून, कोरोनातून बरे झालेल्या तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना या आजाराची लागण अधिक होते. या आजाराचा शिरकाव नाकावाटे होत असून, सायनस होऊन पुढे डोळ्यात आणि मेंदूपर्यंत पोहोचतो यामुळे बरेचदा डोळा आणि जबडा सुद्धा काढावा लागतो.
.............