म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही, जिल्ह्यात २६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:54+5:302021-05-29T04:22:54+5:30
....... ही घ्या काळजी.... रक्तातील साखरेची, एचबीएआयसीची तपासणी, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण, कोविड-१९ नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह ...
.......
ही घ्या काळजी....
रक्तातील साखरेची, एचबीएआयसीची तपासणी, रक्तातील साखरेवर काटेकोर नियंत्रण, कोविड-१९ नंतर रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेह यांचे निरीक्षण करा, स्टेरॉईडचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणेच करा, घरी ऑक्सिजन घेतला जात असल्यास स्वच्छ ह्युमिडीफायरमध्ये निर्जंतुक पाण्याचाच वापर करा व ॲटिबायोटिक्स, अँटिफंगल औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.
......
म्युकरमायकोसिसची ही आहेत लक्षणे
म्युकर नावाची बुरशी जमिनीत, खतांमध्ये सडणाऱ्या फळांत व भाज्यांत, तसेच हवेत आणि अगदी निरोगी व्यक्तींच्या नाकात आणि नाकाच्या स्रावात देखील आढळते. ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते, जसे कर्करोगाचे रुग्ण, एचआयव्ही बाधा असलेले रुग्ण, ज्यांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे असे रुग्ण, अशांमध्ये म्युकरमायकोसिसची बाधा होण्याचे प्रमाण अधिक असू शकते. डोळे दुखणे, डोळ्यांच्या बाजूला लाली येणे, नाकात त्रास होणे, सूज येणे, ताप येणे, डोके दुखणे, खोकला, दात हिरड्या दुखणे, दांत ढिले होणे, श्वास घेण्यास त्रास, दम लागणे, रक्ताची उलटी होणे व मानसिक स्थितीवर परिणाम ही या आजाराची लक्षणे आहेत.
......
औषधाचा पुरेसा साठा, अतिरिक्त केली मागणी
म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण पूर्वी फार कमी निघत होते; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आजाराच्या रुग्णांसाठी आवश्यक असलेले एम्फोटेरिसिन बी इंजेक्शन व औषधे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयातसुद्धा औषधे आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
.......
टास्क फोर्स गठित
म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली. या आजाराचे रुग्ण खासगी रुग्णालयात आढळले तर त्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच कान, नाक, घसा तज्ज्ञ यांचा समावेश असलेल्यांचा टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे.
.....
डॉक्टर काय म्हणतात....
म्युकरमायकोसिस हा आजार संपर्कामुळे होत नाही. कोरोनातून बरे झालेले रुग्ण व स्टेराईडचा अतिरिक्त वापर तसेच अधिक काळ आयसीयूमध्ये राहणाऱ्या रुग्णांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते. या आजाराची लक्षणे दिसताच वेळीच उपचार केल्यास रुग्ण बरा होऊ शकतो.
-डॉ. संजय भगत, ईएनटी तज्ज्ञ.
......
कोरोना बाधित व कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांना या आजाराचा अधिक धोका आहे. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच वेळीच उपचार करावा.
- डॉ.राहुल उईके, ओरल मॅक्सीलो सर्जन.
.....
म्युकरमायकोसिस हा आजार संपर्कात आल्यामुळे होत नाही. तर कोरोनातून बरे झालेल्या, मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्या आणि स्टेरॉईड व आयसीयूमध्ये अधिक काळ राहिलेल्या रुग्णांना या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. प्राथमिक अवस्थेत उपचार केल्यास या आजारावर मात करता येते.
- डॉ. गौरव अग्रवाल सहायक प्राध्यापक, कान, नाक घसा विभाग
................
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे उपचार घेत असलेले रुग्ण : २६
म्युकरमायकोसिस आजाराने मृत्यू झालेले रुग्ण : ०