रहस्यमयी मृत्यूंमुळे दहशत

By Admin | Published: July 6, 2015 01:30 AM2015-07-06T01:30:15+5:302015-07-06T01:30:15+5:30

शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली येथील दोन घरांमध्ये रहस्यमयरीत्या मृत्यू झालेल्या अवस्थेत त्यांच्या घरच्या ...

Mysterious deaths cause panic | रहस्यमयी मृत्यूंमुळे दहशत

रहस्यमयी मृत्यूंमुळे दहशत

googlenewsNext

शेळ्या व कोंबड्यांवर हल्ला : वन्यप्राणीच हल्लेखोर असल्याचा नागरिकांचा अंदाज
गोंदिया : शहराच्या पश्चिम भागाकडील पैकनटोली येथील दोन घरांमध्ये रहस्यमयरीत्या मृत्यू झालेल्या अवस्थेत त्यांच्या घरच्या शेळ्या व कोंबड्या आढळल्या. या प्राण्यांच्या गूढ मृत्यूमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे सावट निर्माण झाले आहे.
रविवारी पहाटे २.३० वाजता प्रकाश रहांगडाले यांना त्यांच्या घरात एका शेळीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी आपल्या भावाला उठविले व ते घरासमोरील खोलीत गेले. त्यावेळी त्यांनी कुत्र्यापेक्षा उंच असलेल्या एका जंगली प्राण्याला पळताना पाहिले. पाठलाग केल्यावर तो प्राणी आवारभिंत ओलांडून पळून गेला. घरासमोर अंधार असल्यामुळे दोन्ही भाऊ त्या प्राण्याला बरोबर पाहू शकले नाही.
सकाळी जेव्हा त्या ठिकाणी लोकमतने पाहणी केली असता रहांगडाले यांच्या घरासमोरील आवारभिंतीला ओलांडून जाताना प्राण्याच्या नखांचे चिन्ह आढळले. पैकनटोली येथे रहांगडाले यांच्याकडे तीन शेळ्या व दोन कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. मृत शेळ्या व कोंबड्यांच्या मानेजवळ चावा घेतल्याचे चिन्ह होते. तिथून रक्त वाहत होते. याचप्रकारे कुंवरलाल नेवारे यांच्या घरीसुद्धा रविवारी पहाटे एक शेळी व पाच कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या.
या घटनेमुळे सर्व आश्चर्यचकीत आहेत. सर्व शेळ्या आजूबाजूला बांधलेल्या मृतावस्थेत पडून होत्या. वन्यप्राणी जर एखाद्या शेळीवर हल्ला करतो तर इतर शेळ्या ओरडतात. दोन कोंबड्या जवळच होत्या. एकावर हल्ला झाला तर दुसरी ओरडते. मात्र असे काहीही न झाल्यामुळे रहांगडाले व त्यांच्या भावाला चिंताग्रस्त करून सोडले आहे. या बाबींची चर्चा नागरिकांमध्ये पसरलेली होती.
अशीच घटना सात दिवसांपूर्वी पैकनटोली जवळील गौतमनगरातसुद्धा घडली होती. गौतमनगर येथील रहिवासी प्यारूभाई कुल्फी विक्री करतात. त्यांच्या घरीसुद्धा सात दिवसांपूर्वी आठ कोंबड्या व सात शेळ्या अज्ञात जनावराचा शिकार झाल्या आहेत. मात्र मेलेल्या पशूंचे मांस किंवा त्यांच्या शरिराला मारणाऱ्या प्राण्याने काही केले नाही.
पैकनटोली व गौतमनगर शहराच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहेत. त्यानंतर शेतशिवार सुरू होते. त्यामुळे एखाद्या वन्यप्राण्यामुळेच या घटना घडल्या असाव्यात, असा अंदाज बांधला जात आहे. तर काही अंधश्रद्धाळू लोक या घटनांना भूत-प्रेताशी जोडू पाहत आहेत.
रविवारी वनविभागाचे चिकित्सक उपलब्ध नसल्यामुळे मेलेल्या शेळ्या व कोंबड्यांची उत्तरीय तपासणी सोमवारी (दि.६) होणार आहे. त्यानंतरच या रहस्यमयी मृत्यूंची पोल-खोल होणार असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
पोलिसांत तक्रार
सदर घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रात्री २.३० वाजता जेव्हा रहांगडाले बंधू गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा पोलिसांनी सुरूवातील तक्रार नोंदविली नाही. नंतर सकाळी ८ वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले व वनविभागाला या घटनेची तक्रार नोंदविण्यास सांगितले.
या आगळ्यावेगळ्या घटनेच्या चौकशीसाठी वनविभागाचे श्वानपथक घटनास्थळी पाठविण्यात आले होते. परंतु त्यांना काहीही मिळाले नाही. आता वनविभाग घटनास्थळी कॅमेरे लावत आहे. त्यामुळे रात्रीच्या घटना उजेडात येवू शकतील.
-अश्विनकुमार ठक्कर
सहायक उपवनसंरक्षक गोंदिया.

Web Title: Mysterious deaths cause panic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.