चुरडी हत्याकांडाचे गूढ कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:45+5:302021-09-26T04:31:45+5:30
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या चुरडी प्रकरणात तिघांची हत्या, तर रेवचंदचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी प्रेसनोटद्वारे दिली. रेवचंदने ...
गोंदिया : तिरोडा तालुक्याच्या चुरडी प्रकरणात तिघांची हत्या, तर रेवचंदचा गळफास घेऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी प्रेसनोटद्वारे दिली. रेवचंदने आत्महत्या का केली, त्याने इतर तिघांना मारले का? या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी यांनी दिली आहे.
सोमवारी (दि.२०) रात्री ही घटना घडली. रेवचंद डोंगरू बिसेन (वय ५१), त्यांची पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) या चौघांचा खून करण्यात आला; परंतु रेवचंदची आत्महत्या नसून त्याचाही खून असल्याच्या चर्चा जोरदार आहेत. तपासाच्या नावावर या घटनेच्या तपासाची माहिती देण्याचे पोलीस टाळतात. बिसेन कुटुंबात घडलेली एवढी मोठी घटना कुण्या एका व्यक्तीकडून करण्यात आली नसावी, तर या घटनेत एकापेक्षा अनेक आरोपींचा समावेश असावा, असा दाट संशय आहे. तिघांवर वार करून ठार करण्यात आले, तर रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. गळा आवळल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, असे उत्तरीय तपासात पुढे आले; परंतु त्याचा गळा आवळून नंतर लटकविण्यात आले की त्याने स्वत: गळफास घेतला ही बाब समोर आली नाही. मालता बिसेन, पौर्णिमा बिसेन व तेजस बिसेन (१७) रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या तिघांना यमसदनी पाठविणारा आरोपी एक नसावा तर हे कृत्य अनेकांचे असावे, रेवचंदने जर हे कृत्य केले तर त्या मागील ठोस कारण काय याचा शोध सुरू असल्याचे तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी यांनी सांगितले आहे.
..............
सायबर सेलच्या हातात काय लागले?
चार दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रक काढून सायबर सेलही या घटनेचा तपास करीत असल्याचे सांगितले. सायबर सेलला या घटनेत आतापर्यंत काय हाती लागले. मृतकांची कोणा कोणासोबत काय-काय झालेली चॅटिंग या सर्वच गोष्टीचा उलगडा होणार का याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.