नगर पंचायतचे वाद येऊ लागले चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:29 AM2021-04-01T04:29:45+5:302021-04-01T04:29:45+5:30

सालेकसा : येथील नगर पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह काही सभापती विरुद्ध इतर सभापती असा वाद मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. ...

Nagar Panchayat disputes started coming to the fore | नगर पंचायतचे वाद येऊ लागले चव्हाट्यावर

नगर पंचायतचे वाद येऊ लागले चव्हाट्यावर

Next

सालेकसा : येथील नगर पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह काही सभापती विरुद्ध इतर सभापती असा वाद मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. आता त्यांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. आपल्या शिफारशीची कोणतीच कामे मंजूर केली जात नसून, नगराध्यक्ष लक्ष देत नसल्याचा आरोप करीत दोन सभापतींनी आपल्या पदाचा राजीनामा देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

तीन वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. बंडखोर गटाचे सर्वांत जास्त नगरसेवक निवडून आले. त्यामुळे भाजप व काँग्रेसला अनुक्रमे दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. जेव्हा नगर पंचायतमध्ये सरकार स्थापन करण्याची वेळ आली तेव्हा बंडखोर गटाने पुन्हा भाजपचा घरोबा केला. परंतु, नगर पंचायतची सत्ता सूत्रे किंगमेकर ठरलेल्या बांधकाम सभापती यांच्या हाती राहिली. तेव्हा त्यांच्याबद्दल काही जणांमध्ये द्वेषसुद्धा निर्माण झाला होता. आमच्या मर्जीने कामे व्हावीत, अशी इच्छा सहकारी सभापती यांच्यासह पक्षाचे व विरोधी पक्षाचे नेते आणि नगरसेवक बाळगत होते. परंतु, शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ही बाब येथे वेळोवेळी सिद्ध होत राहिली. कोणी कितीही तक्रार केली तरी अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सभापतींनी आपल्या पद्धतीने नगर पंचायतचे कामकाज चालविण्याचे काम केले. त्यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशीसुद्धा समन्वय साधला नाही, असा आरोप भाजपचे पदाधिकारी करीत राहिले. मात्र, दोन महिला सभापतींनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती आपल्या मर्जीप्रमाणे कारभार चालवित असून, निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे नगर पंचायतचा वाद चव्हाट्यावर आला आहे.

आपल्या वाॅर्डातील नगरसेवकाकडे किंवा संबंधित सभापतीकडे नागरिक धाव घेत आपल्या समस्या मांडतात. मात्र, या समस्या मार्गी लावण्यासाठी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप सभापतींनी केला आहे. यामुळेच स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा सभापती दमयंता भूमेश्वर कोटांगले आणि महिला व बालकल्याण सभापती मंगला महेश चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यावर अद्यापही कुठलाही विचार करण्यात आला नाही. मात्र, या प्रकारामुळे नगर पंचायतच्या विकासकामाला खीळ बसण्याची शक्यता आहे. आधीच अनेक बाबतीत विकासापासून कोसोदूर असलेल्या नगर पंचायतला खीळ बसण्याची शक्यता आहे.

कोट.....

दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामे व इतर महत्त्वाच्या कामांबद्दल अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि बांधकाम सभापती यांना बोलले असता, यावर त्यांच्याकडून कुठलीच भूमिका पार पाडण्यात आली नाही. दुसरीकडे आपण नागरिकांची कामे मार्गी लावू शकत नसेल तर पदाचा काय उपयोग म्हणून सभापतीपदाचा राजीनामा दिला.

-दमयंता कोटांगले, सभापती आरोग्य, स्वच्छता व पाणीपुरवठा

कोट........

नगर पंचायतमध्ये सभापती असूनसुद्धा निर्णय घेताना आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे मी गटनेता व अध्यक्ष, उपाध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

-मंगला चौधरी, सभापती, महिला व बालकल्याण

कोट....

संबंधित सभापतींनी प्रस्तावित केलेल्या कामाचे नियोजन करून प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेले आहे. मान्यता मिळताच कामे सुरू केली जातील. दाेन्ही सभापतींचा राजीनामा मंजूर केलेला नाही. त्यांची समजूत घालून पुढे सर्व कामे केली जातील.

-वीरेंद्र उईके, नगराध्यक्ष, न. प. सालेकसा

Web Title: Nagar Panchayat disputes started coming to the fore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.