नगर पंचायत सदस्य सहलीवर
By Admin | Published: November 21, 2015 02:12 AM2015-11-21T02:12:23+5:302015-11-21T02:12:23+5:30
स्थानिक नगर पंचायतमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सात सदस्य इतरत्र सहलीवर गेले आहेत, तर दोन सदस्य जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अर्जुनी-मोरगाव : स्थानिक नगर पंचायतमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित सात सदस्य इतरत्र सहलीवर गेले आहेत, तर दोन सदस्य जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक नगरपंचायतची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी पार पडली. २७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षाची निवड होणार आहे. येथे कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत नाही. काँग्रेस ६, भाजपा ६, राष्ट्रवादी २, अपक्ष २ व शिवसेना १ याप्रमाणे बलाबल आहे. काँग्रेस व भाजपला बहुमतासाठी ३ सदस्यांची गरज आहे.
नगराध्यक्षाचे पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदाचे चारही दावेदार काँग्रेस पक्षाचे आहेत. भाजपाजवळ दावेदार उमेदवारच नाही. सत्ता स्थापनेसाठी उमेदवारांना आपल्याकडे वळविण्यास सुरूवात झाली आहे. परंतु तत्पुर्वीच चारही दावेदार सदस्यांसह इतर तीन सदस्यांना तोडफोडीच्या राजकारणापासून अलिप्त ठेवण्याच्या दृष्टीने काँग्रेसने ही खेळी केल्याचे बोलल्या जात आहे.
काँग्रेससोबत सध्या सात सदस्य असले तरी बहुमतासाठी नऊ सदस्यांची गरज आहे. आवश्यक तेवढे संख्याबळ सोबत नसल्याने उपाध्यक्षपदासाठीचा संभ्रम अद्यापही कायम आहे.
विरोधी पक्ष सुद्धा त्या दृष्टीने व्यूहरचनेच्या तयारीला लागल्याने बोलल्या जात आहे. काँग्रेस व भाजपामधून निवडून आलेल्या सदस्यांपेक्षा राष्ट्रवादी, अपक्ष व शिवसेना सदस्यांना अधिक महत्व प्राप्त झाल्याचे दिसून येते.
अध्यक्ष आपल्या पक्षाचा असावा या दृष्टीने भाजप काही सदस्यांच्या संपर्कात आहे. गोंदिया जिल्हा परिषद व स्थानिक पंचायत समितीमध्ये भाजप-काँग्रेस अशी युती आहे. याव्यतिरिक्त इतर पक्ष व अपक्ष सदस्यांनी पाठींबा नाकारल्यास ऐनवेळी काँग्रेस-भाजपा युतीची शक्यता नाकारता येत नाही. जर-तरच्या या राजकारणात कुणाच्या डोक्यावर राजमुकूट चढतो हे लवकरच स्पष्ट होईल. (तालुका प्रतिनिधी)