पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी नगर परिषद - पंचायत कर्मचारी गेले संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:20 PM2024-08-30T16:20:19+5:302024-08-30T16:21:14+5:30
गेट मिटींग घेऊन केले निदर्शन : सर्वत्र कामकाज झाले ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने गुरुवारपासून (दि. २९) काम बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. परिणामी जिल्ह्यातील तीन नगर परिषदा व पाच नगर पंचायतींमधील संवर्ग अधिकारी- कर्मचारीही यात सहभागी झाले असून, त्यांचे कामकाज बंद पडले आहे. सर्वच ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गेट मिटींग घेऊन मागण्यांसाठी निदर्शने केली व कामकाज बंद केले.
महाराष्ट्र शासनांतर्गत नगर परिषदा, नगर पंचायतींमधील सन २००५ नंतरच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांतून कमालीचा रोष व्यक्त होत आहे. यामुळे जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी संघटनेचे सदस्यही आग्रही आहेत. तसेच संघटनेमार्फत शासन, नगरविकास विभाग व नगर परिषद प्रशासन संचालनालयाला वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
ही बाब लक्षात घेत संघटनेकडून १४ ऑगस्ट रोजी विशेष सभा घेण्यात आली असता, त्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे व संघटनेच्या समस्या व मागण्यांना घेऊन गुरुवारपासून (दि. २९) राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने गुरूवारपासून (दि. २९) संप पुकारला आहे.
संपाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि. २९) येथील नगर परिषद कार्यालयात संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गाडकिने यांच्या नेतृत्वात गेट मिटींग घेण्यात आली. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करून कामकाज बंद केले. याशिवाय, जिल्ह्यातील अन्य नगर परिषदा व नगर पंचायतींमध्येही गेट मिटींग घेऊन त्यानंतर कामकाज बंद करण्यात आले.
सुमारे ४५० अधिकारी
कर्मचाऱ्यांचा समावेश बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने घेतला आहे. यामुळे या संपात जिल्ह्यातील तीन नगर परिषदा तसेच पाच नगर पंचायतींमधील संवर्ग अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील नगर परिषदा व पाच नगर पंचायतींमधील अधिकारी-कर्मचारी संपावर गेले आहेत.
स्वच्छता कर्मचारी आज समर्थन देणार
या बेमुदत संपात नगर परिषदा व नगर पंचायतींमधील संवर्ग अधिकारी - कर्मचारी सहभागी असून, त्यात स्वच्छता, वीज, पाणीपुरवठा तसेच प्रशासनिक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता हे अधिकारी- कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे त्यांच्या विभागांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या संपात स्वच्छता कर्मचारीही शुक्रवारपासून सहभागी होणार आहेत, असे स्वच्छता कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तिलक दीप यांनी कळविल्याची माहिती आहे. यानंतर मात्र संपाचा फटका शहरवासीयांनाही बसणार, यात शंका नाही.