नागराधाम कात टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:17 PM2018-01-28T21:17:04+5:302018-01-28T21:17:16+5:30
सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेल्या जवळील ग्राम नागराला प्राचीन शिव मंदिरामुळे नागराधाम नावाने ख्याती प्राप्त आहे. मात्र फक्त शिव मंदिरामुळे ओळख असलेले हे नागराधाम आता कात टाकणार आहे. नागराधाम येथील शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास असलेल्या जवळील ग्राम नागराला प्राचीन शिव मंदिरामुळे नागराधाम नावाने ख्याती प्राप्त आहे. मात्र फक्त शिव मंदिरामुळे ओळख असलेले हे नागराधाम आता कात टाकणार आहे. नागराधाम येथील शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे येथे आता मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यासाठी तसेच नागरा पोहचण्यासाठी विशेष बायपास रस्ता तयार करण्याचे प्रयत्न आमदार गोपालदास अग्रवाल करीत आहेत.
प्राचीन शिवमंदिर यासह परिसरातील भैरव मंदिराजवळ भारतीय पुरातत्व विभागाला खोदकामात मानव निर्मित अतिप्राचीन अवशेष मिळाले आहेत. यामुळे सुमारे ८०० वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास नागराचा आहे. तालुक्याला लाभलेल्या अशा या वरदानाचे जतन करता यावे यासाठी आमदार अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू होते.
यातूनच नागरा शिवमंदिर तिर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. अशात भाविकांच्या सुविधार्थ विकासकामांसाठी आता राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करवून दिला जाईल. परिणामी नागराधाम तिर्थक्षेत्र राज्यातील अन्य धार्मिक तिर्थक्षेत्रांच्या नकाशात प्रामुख्याने नजरेत येणार आहे.
शिवाय येथे भाविकांच्या सुविधेसाठी धर्मशाळा, उपहारगृह व नाट्यगृहाचे बांधकामही अपेक्षीत आहे. तसेच सध्या नागरा शिवमंदिरात जाण्यासाठी वस्तीतून जावे लागत असून यामुळे नागरिकांना त्रास होत असतानाच अरूंद रस्त्यांमुळे अपघातांचीही शक्यता नाकारता येत नाही.
यासाठीच शिवमंदिरात जाण्यासाठी गोंदिया-बालाघाट मार्गाने थेट शिवमंदिर पर्यंत विशेष बायपास रस्ता तयार करण्यासाठी आमदार अग्रवाल प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास नक्कीच नागराधाम कात टाकणार आहे.
तलावात लागणार म्युझिकल फाऊंटेन
शिवमंदिर समोर असलेल्या तलावाचे आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने सौंदर्यीकरण व विद्युतीकरण केले असून पाळीवर पेवींग ब्लॉक पाथ तयार केला आहे. मात्र या तलावासाठी एवढेच पुरेसे नसून आता या तलावात म्युजीकल फाऊं टेन व बोटींग सुरू करण्यासाठी आमदार अग्रवाल यांचे प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास या म्युजीकल फाऊंटेन व बोटींगचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येत येथे नागरिकांची गर्दी राहणार यात शंका नाही.