गोंदिया जिल्ह्यातील रूग्णांची प्लाझ्मासाठी आता नागपूरची दौड नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 11:39 AM2020-12-09T11:39:42+5:302020-12-09T11:42:28+5:30
Gondia News corona गोंदिया जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्या सातत्याने घसरत असतानाच आता आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, येथील शासकीय रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटचा सोमवारी (दि.७) श्रीगणेशा झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्या सातत्याने घसरत असतानाच आता आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, येथील शासकीय रक्त केंद्रातील प्लाझ्मा युनिटचा सोमवारी (दि.७) श्रीगणेशा झाला. युनिटमध्ये कोरोनावर मात केलेल्या ३ कोरोना योद्धांचे प्लाझ्मा संकलीत करण्यात आले आहे. आता येथील रुग्णांना प्लाझ्माची गरज पडल्यास नागपूरपर्यंत पायपीट करावी लागणार नाही.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. ही बाब नक्कीच दिलासादायक असली तरी कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत असून यातूनच टेन्शन वाढत आहे. सोमवारपर्यंत जिल्ह्यात १६८ कोरोना बाधित रूग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे होत असलेली ही क्षती नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी जीवनदायी ठरत आहे. यातूनच जिल्ह्याला प्लाझ्मा युनिटची परवानगी देण्यात आली. मागील महिन्यात यासाठी लागणारी मशिन व अन्य साहित्य मिळाले. प्लाझ्मा थेरपीसाठी येथील शासकीय रक्त केंद्रात विशेष युनिटही तयार करण्यात आले आहे.
या प्लाझ्मा युनिटमध्ये सोमवारी (दि.७) कोरोना मुक्त झालेल्या २ जणांचे प्लाझ्मा संकलीत करून युनिटचा श्रीगणेशा करण्यात आला. मंगळवारी (दि.८) १ प्लाझ्मा संकलीत करण्यात आला आहे. जिल्ह्यात आता प्लाझ्मा युनिट सुरू झाल्याने येथील गंभीर रूग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांना नागपूरची दौड घ्यावी लागणार नाही. शिवाय कोरोनामुळे प्लाझ्मा अभावी आता रूग्णांचा जीव जाणार नाही, हे विशेष. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, विभाग प्रमुख डॉ. विनायक रूखमोडे, डॉ. दिलीप गेडाम, डॉ. ज्योती नेताम, डॉ.यादव, रक्त केंद्रप्रमुख डॉ. संजय चव्हाण, जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे, ट्रामाचे प्रतिनिधी अभिषेक मुके व अन्य उपस्थित होते.
कोरोना योद्धाच आले कामी
येथील प्लाझ्मा युनिटमध्ये संकलीत करण्यात आलेल्या ३ प्लाझ्मा युनिटमध्ये २ ओ पॉझिटिव्ह तर १ बी पॉझिटिव्ह आहे. विशेष म्हणजे, हे प्लाझ्मा देण्यासाठी कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱे कोरोना योद्धाच कामी आले आहेत. त्याच असे की, हे प्लाझ्मा दान करणारे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुनील देशमुख, रक्त केंद्रातील तंत्रज्ञ अमित ठवरे व यशवंत हनवते आहे. कोरोनाचा देशात शिरकाव झाल्यापासून या महामारी विरोधी लढ्यात उतरलेले हे कोरोना योद्धाच आता रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी पुन्हा प्लाझ्मा दान करून आपले युद्ध लढतच आहेत.
शासकीय रूग्णालयातील रूग्णांना नि:शुल्क
जिल्ह्यातील रूग्णांना आता प्लाझ्मासाठी इतरत्र पायपीट करावी लागणार नाही. अशात दिलासादायक बाब म्हणजे, शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना नि:शुल्क प्लाझ्मा दिला जाणार आहे. तर खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांसाठी मात्र तेथील डॉक्टरांकडून एक अर्ज भरवून घेत ५५०० रूपये या शासनाने ठरवून दिलेल्या दरात प्लाझ्मा दिला जाणार आहे. यामुळे मात्र शासकीय कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या व त्यातही गरीब रूग्णांसाठी हे अधिकच दिलासादायक ठरणार आहे.
-----------------------------