बर्लिनच्या नावाखाली आंध्रप्रदेशात गेले पैसे, जर्मनीत घर शोधणाऱ्या विद्यार्थिनीची फसवणूक
By योगेश पांडे | Published: April 11, 2023 05:42 PM2023-04-11T17:42:17+5:302023-04-11T17:42:55+5:30
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद
नागपूर : जर्मनीत शिक्षणासाठी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला ऑनलाईन घर शोधणे महागात पडले. तिची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. बर्लिन येथील एंजेला गेल नामक महिलेच्या नावाखाली तिच्याशी आरोपीने संवाद साधला व प्रत्यक्षात तिने पाठविलेले पैसे आंध्रप्रदेशातील भरत गांधी नामक व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
कोराडी मार्ग परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीचा जर्मनीतील बर्लिन येथील विद्यापीठात प्रवेश झाला आहे. ती लवकरच शिक्षणासाठी तेथे जाणार असून ती तेथे राहण्यासाठी भाड्याचे घर शोधत होती. यासाठी तिने तेथील एका संकेतस्थळावर स्वतःची पूर्ण माहितीदेखील दिली. तिला काही दिवसांनी एंजेला गेल नामक महिलेच्या नावानी ई-मेल आला. त्यात एंजेलाने तिचे घर भाड्याने द्यायचे आहे, असे सांगितले व महिन्याचे भाडे ५० हजार असेल असे सांगितले. त्यांच्यात चॅटिंगदेखील झाले.
३१ जानेवारी रोजी विद्यार्थिनीने तिला जवळपास ५० हजार रुपये मोबाईलवर ऑनलाईन पाठविले. त्यानंतर तिने एंजेलाला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. मात्र मी सध्या कार्यालयात असून येथे संगणकाला कॅमेरा नाही असे कारण एंजेलाने दिले. यावरून विद्यार्थिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व तिने पैसे जेथे पाठविले त्या खात्याची माहिती काढली. संबंधित खाते आंध्रप्रदेश येथील पद्मावती नगर येथील भरत गांधी नामक व्यक्तीचे असल्याचे तिला कळाले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण कोराडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.