नागपूर-यवतमाळ शिवशाहीला लागला ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:55 AM2019-02-10T00:55:36+5:302019-02-10T00:56:09+5:30
प्रवाशांना थेट यवतमाळपर्यंतचा सुखद प्रवास व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने गोंदिया आगारातून गोदिया-यवतमाळसाठी शिवशाही बससेवा सुरू केली होती. मात्र शिवशाहीच्या या फेरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. शिवाय तिकीटही अधिक असल्याने गोंदिया-यवतमाळ शिवशाहीला ‘ब्रेक’ लागला आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रवाशांना थेट यवतमाळपर्यंतचा सुखद प्रवास व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाने गोंदिया आगारातून गोदिया-यवतमाळसाठी शिवशाही बससेवा सुरू केली होती. मात्र शिवशाहीच्या या फेरीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. शिवाय तिकीटही अधिक असल्याने गोंदिया-यवतमाळ शिवशाहीला ‘ब्रेक’ लागला आहे.त्यामुळे आता ही शिवशाही नागपूरपर्यंत धावत आहे.
प्रवाशांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत सुखरू सोडून देण्यासाठी ‘लालपरी’ आपली सेवा देत आहे. त्यातल्या त्यात प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद करता यावा यासाठी महामंडळाने ‘शिवशाही’ आणली. अत्यंत आरामदायक असलेल्या या बसेस लांबवरच्या प्रवासासाठी अत्यंत सुविधाजनक आहेत.
गोंदिया आगाराला अशा ४ शिवशाही देण्यात आल्या असून त्यातील ३ गाड्या गोंदिया-नागपूर तर एक गाडी गोंदिया-यवतमाळ फेरी मारत होती. यवतमाळसाठी थेट प्रवासाची सोय नसल्याने या गाडीला चांगला प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा या फेरी मागे असावी. सकाळी ६.१५ वाजता ही गाडी येथून सुटत होती. मात्र सुमारे ६ महिने धावलेल्या गोंदिया-यवतमाळ गाडीला प्रवाशांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
विशेष म्हणजे, यवतमाळपर्यंत प्रवासासाठी गाडीत २-४ प्रवासी राहत होते अशी स्थिती होती. म्हणजेच, या फेरीतून आगाराला डिजेलचेही पैसे काढता येत नव्हते. प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या फेरीला प्रवाशांनीच नाकारल्याने अखेर गोंदिया आगाराने शिवशाहीची गोंदिया-यवतमाळ फेरी बंद पाडली. त्यामुळे आता ही शिवशाही गोंदिया-नागपूर धावत आहे. तर यवतमाळ प्रवासासाठी लालपरी प्रवाशांच्या सेवेत आली आहे.
तिकीट सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
यवतमाळपर्यंत आरामदायक प्रवासाची सोय करून देणारी शिवशाही सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती.याचाही फटका शिवशाहीच्या यवतमाळ फेरीला भोवला. शिवशाहीसाठी आगाराकडून ११ रूपये पर स्टेज आकारले जात होते. लालपरीसाठी ८ रूपये पर स्टेज आकारले जात असून एशियाडसाठी १० रूपये पर स्टेड आकारले जाते. येथे ६ किलो मीटरचे अंतर म्हणजे १ स्टेज होत असून यावरून यवतमाळपर्यंतचे तिकीट दर काढता येईल. एकंदर लालपरीच्या तुलनेत शिवशाहीचा प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने प्रवासी शिवशाहीचा प्रवास टाळत होते.