गुप्तधनाच्या नावावर लुटणारी टोळी सक्रिय
By admin | Published: March 2, 2016 02:10 AM2016-03-02T02:10:00+5:302016-03-02T02:10:00+5:30
गुप्तधन मिळवून देण्याच्या नावावर लुबाडणाऱ्या टोळ्या गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातही दाखल झाल्या आहेत.
कासवांची मोठ्या किमतीत खरेदी : बेपत्ता असलेल्या पायाळू मुला-मुलींचा नरबळी?
गोंदिया : गुप्तधन मिळवून देण्याच्या नावावर लुबाडणाऱ्या टोळ्या गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातही दाखल झाल्या आहेत. लाखो रूपयांचा हा गोरखधंदा छुप्या मार्गाने चालत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक मुले, मुली व पायाळू व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांचा नरबळी तर देण्यात आला नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.
जिल्ह्यातील अनेक लोक गुप्तधनाच्या नावावर लुबाडल्या जात आहेत. या गुप्तधनाच्या लालसेपायी कासवांना मोठी किंमत देऊन विकत घेतले जात आहे. गुप्तधन शोधण्याच्या नावावर कासवाचा वापर केला जात असल्याने छुप्या मार्गाने कासवाचाही गोरखधंदा चालू आहे. आपल्या घरच्या विहीरीत किंवा टाक्यात या कासवांना ठेवले जाते. चारचाकी वाहनात पोत्यांमध्ये टाकून कासवांची तस्करी केली जाते.
गोंदियातील कासव गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर व बालाघाट येथेही नेणे-आणणे सुरू आहे. १० किलो वजनाच्या कासवाची किंमत एक ते दोन लाखाच्या घरात आहे. गुप्तधनासाठी अघोरी कृत्य म्हणजेच नरबळीही दिला जात असल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मुले, मुली, इसम व महिला बेपत्ता आहेत. त्यांचा सुगावा आतापर्यंत लागला नाही. अघोरी कृत्यासाठी त्यांचा नरबळी तर दिला गेला नाही, अशीही शंका घेतली जात आहे. नागपूर येथील टोळ्या गुप्तधनासाठी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. याकडे लक्ष घातल्यास आरोपींचा छडा लावण्यात पोलिसांना यश येऊ शकतो. (तालुका प्रतिनिधी)
दवनीवाडा प्रकरणातील आरोपींची संख्या पाच
दवनीवाडा येथील सेवकराम शिवचरण डोहरे (३१) यांना गुप्तधन मिळवून देण्याच्या नावावर त्यांना गंडविणाऱ्या आरोपींची संख्या पाच झाली आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे तर तिघे फरार असल्याची माहिती दवनीवाडा पोलिसांनी दिली. नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील पंचधार कचोरी येथील आरोपी शंकर रूपचंद सोलंकी व रंगलाला श्रीराम गोंदी (३०) यांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. या प्रकरणात लखन श्रीराम गोंदी व चांदगीर भोला सोलंकी आणि अन्य एक असे तिघे फरार आहेत.
हातचलाखीने काढतात हंडे, मूर्ती
दवनीवाडा येथील सेवकराम शिवचरण डोहरे यांच्या घरातून आरोपीने एक तांब्याचा हंडा काढला. त्यात पितळीच्या ४२ मूर्ती आढळल्या आहेत. प्रकरण अंगावर येईल अशी भिती दाखवून घरातील मंडळींना घरातून बाहेर जायला सांगतात. त्या घरातील एखादा व्यक्ती तिथे असल्यास त्याला दही, दूध आणण्याच्या नावावर बाहेर पाठवितात. याचदरम्यान सोबत आणलेला हंडा व त्यातील मूर्ती गाडून खड्डा खादण्याचे नाटक केले जाते. गाडलेला तो हंडा घरचा व्यक्ती आल्यावर थोडे खोदकाम करण्याचे नाटक करून बाहेर काढतात. यातून समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली जाते. अशा प्रकरणातून लोकांची फसवणूक करण्याचे काम या टोळीतील सदस्य करतात.