१७,१९१ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:39+5:302021-07-02T04:20:39+5:30
गोंदिया : मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावापुढे त्यांचे छायाचित्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही, अशा ...
गोंदिया : मतदार याद्यांमध्ये मतदारांच्या नावापुढे त्यांचे छायाचित्र अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही, अशा मतदारांना छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत ५ जुलै रोजी संपणार आहेत. मात्र, अद्यापही १७,१९१ मतदारांनी आपले छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा केले नाही. त्यामुळे आता त्यांनी ५ जुलैपर्यंत छायाचित्र जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून कमी केली जाणार आहेत. यासंदर्भात पत्र जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढले आहे. भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघांची मतदार यादी जाहीर केली.
.............
छायाचित्र जमा करण्यास ५ जुुुलैची डेडलाइन
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित तिन्ही मतदारसंघांत अद्यापही १७,१९१ मतदारांनी त्यांचे छायाचित्र तालुकास्तरावरील निवडणूक विभागाकडे जमा केलेले नाही. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील १४,९४६ मतदारांनी अद्यापही आपले छायाचित्र जमा केलेले नाही. त्यामुळे त्यांना ५ जुलैपर्यंत छायाचित्र जमा करण्यासाठी वेळ असून, यानंतर छायाचित्र जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत.
..................
येथे जमा करा छायाचित्र
- मतदार यादीची तपासणी करून आपल्या नावासाेबत छायाचित्र आहे किंवा नाही याची तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात जाऊन चौकशी करावी.
- मतदार यादीत छायाचित्र नसल्यास त्वरित संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे जमा करावे.
- मतदार यादीत ज्यांचे छायाचित्र नाही त्यांनी ५ जुलैपर्यंत छायाचित्र जमा न केल्यास त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
......................
कोट :
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्वच मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत असणे अनिवार्य आहे. यासाठी विशेष कार्यक्रमसुद्धा निवडणूक विभागातर्फे राबविण्यात आला. जिल्ह्यातील १७,१९१ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसून, त्यांनी ५ जुलैपर्यंत छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा करणे अनिवार्य आहे.
-राजेश खवले, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी
..............
विधानसभा एकूण मतदार छायाचित्र नसलेले मतदार
गोंदिया ३,१२,५९१ १४,९४६
तिरोडा २,५१,१८९ १,६७२
अर्जुनी मोर २,५०,२५९ ०००००
आमगाव २,६१,८९७ ५७३
....................................................
जिल्ह्यात एकूण मतदार : १०,५७,९३६
एकूण पुरुष : ५,३५,७१५
एकूण महिला : ५,४०,२२०
छायाचित्र न दिलेले मतदार : १७,१९१
छायाचित्र न दिलेले पुरुष मतदार : १०,१९१
छायाचित्र न दिलेल्या महिला मतदार : ७,०००
..................