इर्री येथील तत्कालीन ग्रामसेवक नरेश बघेले निलंबित; १२ पैकी ८ मुद्द्यांत आढळला दोषी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 08:25 PM2023-07-26T20:25:23+5:302023-07-26T20:29:19+5:30
गावविकासाचे काम न करता लोकांना वेठीस धरणाऱ्या ग्रामसेवकाची १२ मुद्द्यांची तक्रार जि. प. सदस्या लक्ष्मी तरोणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांच्याकडे २ मे रोजी केली होती.
गोंदिया : इर्री ग्रामपंचायत येथील तत्कालीन ग्रामसेवक नरेश बघेले यांच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त होऊन परिचराने विष प्राशन करून आत्महत्या केली. गावविकासाचे काम न करता लोकांना वेठीस धरणाऱ्या ग्रामसेवकाची १२ मुद्द्यांची तक्रार जि. प. सदस्या लक्ष्मी तरोणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांच्याकडे २ मे रोजी केली होती. या तक्रारीवर त्वरित दखल न घेतल्यामुळे इर्री येथील परिचरावर आत्महत्येची पाळी आली. परिणामी आता त्या तक्रारीच्या आधारावर ग्रामसेवक नरेश बघेले याला १९ जुलै रोजी निलंबित करण्यात आले.
गोंदिया तालुक्यातील इर्री येथील ग्रामसेवक नरेश बघेले याच्या अनागोंदी कारभाराला तेथील कर्मचारी व पदाधिकारी कंटाळलेले होते. त्या ग्रामसेवकाची वारंवार तक्रार करूनही पं. स. किंवा जि. प. लक्ष देत नव्हती. त्यामुळे ग्रामसेवकाचा अनागोंदी कारभार सुरूच होता. परिणामी परिचराला आत्महत्या करावी लागली. या ग्रामसेवकाची तक्रार २ मे रोजी आसोली जि. प. क्षेत्राच्या सदस्या लक्ष्मी तरोणे यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. कामात अनियमितता, भ्रष्टाचार, शौचालयाचे अनुदान लाभार्थींना न देणे अशा विविध १२ मुद्द्यांच्या आधारे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने झालेल्या चौकशीत ८ मुद्द्यांत ग्रामसेवक प्रथम चौकशीत दोषी आढळल्याने १९ जुलै रोजी त्याला निलंबित करण्यात आले. ग्रामसेवक बघेले यांच्या हलगर्जीपणामुळे माजी व प्रभारी सरपंचाला तुरुंगात जावे लागले होते.
शौचालयाच्या ५२ लाभार्थींचे ६.२४ लाख गेले परत
इर्री येथील ५२ लोकांनी आपल्या घरी शौचालय बांधले. त्यांच्या शौचालय बांधकामाचे ६ लाख २४ हजार रुपये २८ ऑक्टोबर २०२२ ला १२ हजार रुपये प्रति लाभार्थी प्रमाणे मिळाले होते. परंतु ग्रामसेवक बघेले यांनी ऑनलाईन न केल्याची आडकाठी पुढे करून त्यांना शौचालयाचा लाभ दिला नाही. परिणामी ६ लाख २४ हजार रुपये परत गेले.