मोक्षधामातून चोरुन नेली कचरापेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:18 PM2018-10-01T21:18:16+5:302018-10-01T21:18:38+5:30
देशात सर्वत्र ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबवून स्वच्छ व सुंदर परिसर बनविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. परंतु येथील मोक्षधामात लावण्यात आलेली कचरापेटी चोरुन नेत त्यातील कचरा पसरवून ठेवल्याचे काम काही स्वच्छतेच्या वैरी समाज कंटकांनी केले आहे. त्यामुळे मोक्षधाम सेवा समितीचे सदस्य आणि स्वच्छता दूत संतापले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : देशात सर्वत्र ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम राबवून स्वच्छ व सुंदर परिसर बनविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. परंतु येथील मोक्षधामात लावण्यात आलेली कचरापेटी चोरुन नेत त्यातील कचरा पसरवून ठेवल्याचे काम काही स्वच्छतेच्या वैरी समाज कंटकांनी केले आहे. त्यामुळे मोक्षधाम सेवा समितीचे सदस्य आणि स्वच्छता दूत संतापले आहेत.
मोक्षधाम सेवा समिती अंतर्गत स्वच्छता दूत आपला वेळात वेळ काढून दर रविवारी मोक्षधाम परिसरात श्रमदान करीत आहेत. स्वच्छता तसेच वृक्षारोपण, कुंपन लावणे, बसण्याची व्यवस्था करणे इत्यादी सेवा कार्य स्वयंसेवक बनून ते करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे येथील मोक्षधाम परिसर स्वच्छ, सुंदर व चांगला झाला असून अंत्यसंस्कार करायला आलेल्या लोकांना निवांत बसून अंत्यसस्कारच्या कार्यक्रमात सहभागी होता येत आहे. परंतु काही समाजकंटक आणि स्वच्छतेच्या वैऱ्यांनी या कामाला अप्रत्यक्षपणे विरोध करण्याचा काम सुरू केले आहे.
चांगले काम करीत असल्याने मोक्षधाम सेवा समितीच्या स्वच्छता दुतांना मिळणारा मान, सम्मान व प्रसिध्दी काही असामाजिक तत्वांना पचनी पडत नाही.
त्यामुळे ते लोक येथे सहकार्य तर करीत नाही. परंतु शांत बसून ही राहू शकत नाही आणि उलट रात्री बेरात्री येऊन कामात अडथळे निर्माण करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे स्वयंसेवक म्हणून काम करणारे स्वच्छता दूत संतापले आहेत.
यात काहींनी आता ही स्वच्छतेची नि:स्वार्थ सेवा त्याग करण्याचे नैराश्यपूर्ण मत मांडले. मोक्षधामात संपूर्ण शहरातील लोक अंत्यसंस्कारासाठी येतात व कळत न कळत या परिसरात केरकचरा आणि घाण पसरवून निघून जातात. परंतु ती घाण आणि केरकचरा उचलून परिसर स्वच्छ करण्यासाठी मोक्षधाम सेवा समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
मोक्षधाम परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी समितीचे सदस्य परिश्रम घेत असताना मात्र काही जण त्यांच्या चांगल्या कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे समितीच्या सदस्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
मोक्षधाम बनले मद्यपानाचा अड्डा
एकीकडे मोक्षधाम सेवा समितीचे कार्यकर्ते या मोक्षधाम स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. परंतु याच दरम्यान काही असामाजिक तत्व मोक्षधाम परिसराचा उपयोग मद्य सेवन व इतर अशोभनीय कामासाठी करुन घेत आहेत असे मागील काही आठवड्यांपासून दिसून येत आहे. मद्यपी लोक येथे दारु व पाण्याच्या बाटल्या आणि डिस्पोजल घेऊन येतात. दारु पिऊन झाल्यावर त्या रिकाम्या बाटल्या आणि डिस्पोजल तेथेच टाकून निघून जातात. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून कारवाही करण्याची मागणी केली जात आहे.