वन्यप्राण्यांंसाठी राष्ट्रीय महामार्ग ठरताहे कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:01 PM2018-09-16T22:01:44+5:302018-09-16T22:02:24+5:30
नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते.
राजेश मुनिश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते. या मार्गावर स्पीड ब्रेकरचा अभाव आणि महामार्गालगत ताराच्या कुंपनाचा अभाव असल्याने वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.
मागील वर्षभरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन बिबट, एक रानगवा, एक अस्वल व एक तडस प्राण्यांचा अपघातात बळी गेला. त्यानंतर शुक्रवारी(दि.१४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.
डुग्गीपार ते देवपायली व बाम्हणी खडकी ते पुतळी फाटा- मासुलकसा या बफर झोन परिसराच्या पाच कि.मी.अंतरात वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरचे गाव परिसरातील काहीजण रात्रभरात त्या प्राण्यांचे अवशेषच गायब करीत असल्याची चर्चा आहे. यासाठी वन्यजीव विभाग व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प व बफरझोन परिसरातील महामार्गावर (गतीरोधक) स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी तयार करण्याची गरज आहे. कोहमारा गावापासून मुरदोलीपर्यंत विविध वन्य प्राण्यांचे फोटो लावून जनजागृती केली पाहिजे. प्राण्यांचे फोटो लावल्याने वाहन चालकही आपल्या वाहनाच्या वेग नियंत्रीत ठेवतील. त्यामुळे अपघाताच्या घटनांवर आळा घालणे शक्य होईल. मात्र वन्यजीव व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळीमाती, कवलेवाडा व झनकारगोंदी या तीन गावांचा पुनर्वसन झाल्याने आता व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वन्यप्राण्यांचे वाढते अपघात रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे.