सडक अर्जुनी येथील वाढत्या अतिक्रमणाकडे न.पं.ची डोळेझाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 03:09 PM2024-09-19T15:09:26+5:302024-09-19T15:10:08+5:30
विकासकामात अडथळा : शहरवासीयांचा नगर पंचायतवर रोष
राजकुमार भगत
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : येथील शहरात अतिक्रमणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील विकासकामात अडचण निर्माण होत आहे; पण अतिक्रमणधारकांवर कुठलीच कारवाई केली जात नसल्याने शहरवासीयांनी नगरपंचायतवर रोष व्यक्त केला आहे.
सडक अर्जुनी ग्रामपंचायतचे सन २०१५-१६ मध्ये नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे सडक अर्जुनी सारख्या छोट्याशा तालुक्याला नगरपंचायतचा दर्जा प्राप्त झाला. यामुळे विकास होऊन चेहरा मोहरा बदलणार, असे शहरवासीयांना वाटू लागले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र आहे.
सडक अर्जुनी शहरात अतिक्रमण करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील काही मोक्याच्या व शासकीय जागा व जिल्हा परिषदेवर जागेवर अतिक्रमण केले जात आहे. याचा शहरातील विकास कामांवर परिणाम होत आहे. अतिक्रमणधारकांना नगरपंचायत व प्रशासनाचा कुठलाच धाक राहिलेला नाही.
नगरपंचायतने या अतिक्रमणधारकांवर वेळीच कारवाई करण्याची गरज असताना ते याकडे डोळेझाक करीत आहे. परिणामी, अतिक्रमणधारकांची हिंमत दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे शहरवासीयांनी नगरपंचायतवर रोष व्यक्त केला आहे.
वेळीच पावले उचलण्याची गरज
सडक अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असून, या शहराला नगरपंचायतचा दर्जा मिळाल्याने अनेक शासकीय कार्यालय येथे येणार आहेत. त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची जवाबदारी नगरपंचायत प्रशासनाची आहे. त्याशिवाय सडक अर्जुनीचा विकास होऊ शकणार नाही, त्याकरिता नगर- पंचायतमध्ये दूरदृष्टी असलेले मुख्याधिकारी, अध्यक्ष व नगरसेवकांची गरज आहे. वेळप्रसंगी वाद-विवाद झाला तरी त्याला सामोरे जाण्याची ठेवावी लागेल. तेव्हाच शहरातील वाढत्या अतिक्रमणाला ब्रेक लागू शकतो.
नगरपंचायतचे मोकळ्या जागांकडे दुर्लक्ष
शहरात अनेक लेआऊटची निर्मिती झाली. त्या प्रत्येक लेआऊटमध्ये ओपन स्पेस असते. त्या ओपन स्पेसचा उपयोग बगिचा, अंगणवाडी, खेळाचे मैदान, व्यायामशाळा यासाठी करणे गरजेचे आहे. परंतु नगरपंचा- यतचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. ओपन स्पेसमधील जागा विकसित करण्यात नगरपंचायत अपयशी ठरली आहे. प्रभाग क्रमांक १७ मध्ये एका लेआऊट मालकाने ओपन स्पेसमधील प्लॉटची विक्री केल्याचा प्रकार पुढे आला होता; पण यानंतरही नगरपंचायतने कसलाच बोध घेतला नाही.