चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:48 PM2020-02-21T23:48:59+5:302020-02-21T23:50:00+5:30
जुन्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या सेवा खंडीत हजेरी सहायकांची संख्या राज्यात ४२ आहे. फक्त गोंदिया जिल्ह्यात २५ हजेरी सहायक आहेत. त्यात आमगाव तालुक्यात नऊ, सालेकसा तालुका नऊ, देवरी तालुका एक, गोंदिया तालुका एक व सडक-अर्जुनी तालुक्यात १० अशा २५ जणांना १९ डिसेंबर २०१८ रोजी त्यांच्या पंचायत समितीत रूजू करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जुन्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या सेवा खंडीत हजेरी सहायकांना (सध्या कार्यरत मेट) १९ डिसेंबर २०१८ पासून पंचायत समित्यांमध्ये रूजू करण्यात आले. परंतु १४ महिन्यांचा कालावधी लोटूनही त्यांना आतापर्यंत वेतन देण्यात आले नाही. वेतन देण्यात यावे या मागणीला घेऊन जिल्ह्यातील सर्वच मेट बेमुदत उपोषणावर बसले आहेत. यातील चार उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
जुन्या रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या सेवा खंडीत हजेरी सहायकांची संख्या राज्यात ४२ आहे. फक्त गोंदिया जिल्ह्यात २५ हजेरी सहायक आहेत. त्यात आमगाव तालुक्यात नऊ, सालेकसा तालुका नऊ, देवरी तालुका एक, गोंदिया तालुका एक व सडक-अर्जुनी तालुक्यात १० अशा २५ जणांना १९ डिसेंबर २०१८ रोजी त्यांच्या पंचायत समितीत रूजू करण्यात आले. परंतु रूजू झाल्यापासून आतापर्यंत त्यांना वेतन देण्यात आलेले नाही. प्रशासकीय निधीतून ६ टक्के रक्कम देण्याचे शासनाने १ मार्च २०१९ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठरविले होते. परंतु त्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यात आली नाही.
परिणामी या हजेरी सहायकांवर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे सर्व हजेरी सहायकांनी जिल्हा परिषद इमारत समोरील पतंगा मैदानात १० फेब्रुवारीपासून उपोषणाला सुरूवात केली आहे. उपोषणाला १२ दिवस लोटले तरीही त्यांची समस्या सुटली नाही.
अशात मात्र थानसिंग रहांगडाले, शामराव भांडारकर, लक्ष्मण बारसे व रवी चंद्रिकापुरे या चौघांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपाचारसाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर उपोषणावर आत्माराम भेलावे, देवराम मेंढे, मुनेश्वर कांबळे, रवी सोनटक्के, अशोक दहिवले, दिगंबर कोरे, श्यामकैलास देसाई, घनश्या म फुंडे, राजेंद्र मेश्राम, लिलाधर बहेकार, तेजराम कोरे, भानूदास डोये, विनोद लांजेवार, अनिल कोरे, पारासर कठाणे, भागवत सोनवाने, रामचंद्र बडोले व ईतर बसले आहेत.