निसर्गाने दिली साथ मात्र वन्यप्राणी करतात घात
By admin | Published: September 22, 2016 12:42 AM2016-09-22T00:42:55+5:302016-09-22T00:42:55+5:30
पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते.
विहीरगाव ग्रामवासीयांची व्यथा : रानडुकरे व हरिणांचा उपद्रव सुरू
बोंडगावदेवी : पाणी त्याची बाणी व कसेल त्याची शेती, असे शेती हंगामासाठी प्रामुख्याने बोलल्या जाते. यावर्षीचा शेती हंगाम प्रारंभीच अत्यंत दगदगीचा व आर्थिक क्लेशदायक ठरणारा गेला. परंतु नंतर आलेल्या दमदार पावसाने हिरवेगार झालेले शेत वन्यप्राण्यांच्या हैदोसाने नष्ट होत आहेत.
विहीरगाव, सिलेझरी शेतशिवारात पुरेसा पाण्याच्या अभवानी शेतजमिनी पडीत राहिल्या. ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने रोपांची वाढ खुंटली. गेल्या दहा-बारा दिवसांमध्ये दमदार पाऊस बरसल्याने धानाच्या पिकांना जीवदान भेटून नवसंजिवनी मिळाली. शेतशिवार हिरवा शालू पांघरल्यासारखा दिसते. धान रोपांची डोळ्यात भरण्यासारखी वाढ पाहून गावातील बळीराजांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले दिसते. ऐनवेळी निसर्गाने चांगली साथ दिली. परंतु दुसरीकडे जंगलामधील वन्यप्राणी धान पिकांचे घात करीत आहेत, अशी व्यथा विहीरगावच्या शेतकऱ्यांनी मांडली.
विहीरगाव (बर्ड्या), सिलेझरी गावातील शेतकऱ्यांच्या बहुतांश जमिनी जंगलव्याप्त परिसराला लागून आहेत. जंगली जनावरांचा गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. शेतामध्ये असलेले उभे पीक वन्यप्राणी झुंबडाने येवून संपूर्ण नेस्तनाबूत करतात, अशी विहिरगाववासीय शेतकऱ्यांची ओरड आहे. विशेषत: रानटी डुक्कर, हरिण यांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असल्याने धानपिकाची नासाडी होत असल्याचे विहीरगावचे शेतकरी बेनीराम शिवणकर यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांचा नेहमीच धुमाकूळ असल्याने शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची युवा प्रगतीशील शेतकरी विश्वनाथ वालदे यांनी आपबीती सांगितली. विहीरगाव व सिलेझरी शेतशिवाराला जंगलव्याप्त परिसर आहे. शेताजवळच्या भागात तलावसुद्धा आहे. वन्यप्राण्यांसाठी आवश्यक असलेली संरक्षित जागा असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असल्याचे विहीरगावचे शेतकरी शालीकराम गायधने, गोपीचंद शिवणकर, डोये, प्रेमलाल शिवणकर यांनी सांगितले.
मागील आठवड्यामध्ये निसर्गाने खुल्यामनाने कृपापात्र दाखविल्याने धान पिकाला दिलासा मिळून जीवदान मिळाले आहे. हलक्या प्रतीचे धान निसवत आहे. सध्या धानाचा हंगाम ‘सोने पे सुहाना’ सारखा आहे. परंतु वन्यप्राणी आजघडीला धानपिकाचे घात करीत असल्याचे विहीरगावच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नवेगावबांध वनपरिक्षेत्रात सदर परिसर येत असून वनविभागाने जंगली जनावरांना आळा घालण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)