ग्रामपंचायतच्या पुढाकाराने प्रवासी निवाऱ्याला नवसंजीवनी
By admin | Published: February 2, 2017 01:03 AM2017-02-02T01:03:19+5:302017-02-02T01:03:19+5:30
गावातील प्रवाशांना बसण्यायोग्य नसलेल्या प्रवासी निवाऱ्याला नवसंजीवनी देण्याचे काम सरपंच प्रकाश टेंभुर्णे यांनी केले.
पाठपुराव्यात सातत्य : सरपंच टेंभुर्णे यांचे योगदान
बोंडगावदेवी : गावातील प्रवाशांना बसण्यायोग्य नसलेल्या प्रवासी निवाऱ्याला नवसंजीवनी देण्याचे काम सरपंच प्रकाश टेंभुर्णे यांनी केले. यासाठी लोकमतने अनेकदा वृत्त प्रकाशित करून स्थानिक पदाधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रीत केले होते.
गावचा विकास ग्रामपंचायतच्या जागरूक लोकप्रतिनिधींवर अवलंबून असते. गावातील आवश्यक मुलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी गावपातळीवरील सरपंच यांची भूमिका निर्णायक ठरते. गावात भेडसावणाऱ्या गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी तालुक्याच्या अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवून आवश्यक निधी पदरात पाडणारा लोकप्रतिनिधी गावाला लाभला तर गावाचा सर्वांगिण विकास करण्यास वेळ लागत नाही. गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन कार्य करणारे सरपंच सिलेझरी ग्रामपंचायतला लाभले. आजघडीला प्रकाश टेंभुर्णे यांच्या कारकिर्दीत अनेक विकासाची कामे गावात मोठ्या प्रमाणात होत आहेत.
अर्जुनी-मोरगाव ते सानगडी रस्त्यावर असलेल्या सिलेझरी येथे सन १९९८-९९ मध्ये तत्कालीन आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवाऱ्याचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम झाले तेव्हापासून त्या प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी कोणतीच यंत्रणा पुढे सरसावली नाही. १५ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्रवासी निवाऱ्याची दयनिय स्थिती झाली होती. बैठक व्यवस्था मोडकळीस येवून सर्वत्र मातीचे साम्राज्य पसरले होते. प्रवाशांना थांबण्यासाठी योग्य ते ठिकाण नव्हते. प्रवाशांना झाडांच्या खाली आश्रय घेऊन बसची प्रतीक्षा करावी लागत होती. सामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन लोकमतने २५ डिसेंबर २०१६ रोजी ‘सिलेझरी प्रवासी निवाऱ्याची खस्ता हालत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून लोकप्रतिनिधींचे लक्ष केंद्रीत करण्यात आले. लोकमतच्या वृत्ताची दखल घेऊन ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष व जागरूक सरपंच प्रकाश टेंभुर्णे यांनी निधीची जमवाजमव करून अंदाजे ४० हजार रुपये खर्च त्या प्रवासी निवाऱ्यावर केले. त्यामुळे जीर्णावस्थेत असलेल्या प्रवासी निवाऱ्याला नवसंजीवनी मिळाली. (वार्ताहर)