नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील गाईडला नव्याने नोंदणीची अट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 09:35 PM2019-03-19T21:35:16+5:302019-03-19T21:35:59+5:30
नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक यांनी एक पत्र काढून निसर्ग पर्यटन हंगाम २०१८-१९ करिता निसर्ग, पर्यटक मार्गदर्शकांनी (गाईड) नोंदणी करावी, अन्यथा गाईडला गेटवर प्रवेश मिळणार नाही, असा आदेश काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक यांनी एक पत्र काढून निसर्ग पर्यटन हंगाम २०१८-१९ करिता निसर्ग, पर्यटक मार्गदर्शकांनी (गाईड) नोंदणी करावी, अन्यथा गाईडला गेटवर प्रवेश मिळणार नाही, असा आदेश काढला. तर २००६ ला आम्ही रितसर नोंदणी केली आहे. वारंवार नोंदणी नको म्हणून नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील सर्व गाईडनी पुन्हा नोंदणी करण्यास नकार दिला आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध यांनी १० मार्चपासून गाईडना नोंदणीचे कारण देत प्रवेश नाकारला आहे. परिणामी गाईड अभावी बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होत आहे. तर इकडे राष्ट्रीय उद्यानाच्या सरंक्षणासाठी असलेल्या वनरक्षक व स्थायी-अस्याथी वनमजुरांना पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी कामाला लावण्यात आल्यामुळे राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणावर प्रश्च चिन्ह निर्माण झाला आहे. २९ मार्च २००६ ला वन्यजीव संरक्षण विभागाने रितसर जाहीरात काढून गाईड्सची भर्ती केली होती. तसेच प्रशिक्षण देऊन ओळखपत्रे दिली. त्यानुसार आजपर्यंत आम्ही गाईडचे (पर्यटक मार्गदर्शक) काम करीत आहोत. मग दरवर्षी १०० रुपये शुल्क भरुन नव्याने नोंदणी करण्याची गरज काय? असा सवाल गाईड संजय शहारे यांनी उपस्थित केला आहे. १६ मार्चला कलकत्ता येथील विज्ञान महाविद्यालयाचे पर्यटक राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यायला आले होते. परंतु गाईडना १० मार्चपासून गेटवर प्रवेश नाकारण्यात आल्यामुळे खोली गेटवर एकही गाईड नव्हते. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत दीड तास पर्यटकांना गेटवर ताटकळत उभे रहावे लागले. नंतर राष्ट्रीेय उद्यान नवेगावबांध येथील संरक्षणासाठी नियुक्त असलेल्या दोन वनरक्षक व एक वनमजुराला पर्यटकांना मार्गदर्शनाच्या कामाला लावण्यात आले. तेव्हा कुठे कलकत्याच्या पर्यटकांना राष्ट्रीय उद्यानात भ्रमतीसाठी जाता आले. जांभळी, बकी गेटवरही हेच चित्र पाहायला मिळाले. राष्ट्रीय उद्यानाच्या वन व वन्यजीवाच्या संरक्षणासाठी वनरक्षक व वनमजुरांची नियुक्ती असतांना त्याना पर्यटकांचे मार्गदर्शन म्हणून कामाला लावल्याने वन व वन्यजीवांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गाईडवर उपासमारीची पाळी
वन व वन्यजीवसंरक्षणाचे काम सोडून वनरक्षक व स्थायी-अस्याथी वनमजुरांना पर्यटकांचे मार्गदर्शन करावे लागत आहे. तर दुसरीकडे नव्याने नोंदणी प्रतिष्ठानकडे केलीे नाही म्हणून प्रवेशद्वारावर गाईडना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
गाईडचे आंदोलन सुरू
महाराष्ट्र राज्य अभयारण्य गाईडस युनियनच्या वतीने गाईडच्या सेवेत कायम करण्यात यावे, निश्चित वेतन द्यावे, विमा संरक्षण द्यावे, गाईडसच्या भरतीत व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या गावातीलच युवक-युवतींना प्राधान्य द्यावे आदी मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे नव्याने नोंदणी केल्यास २००६ पासूनची आमची सेवा प्रभावीत होईल,अशी भिती गाईडनी व्यक्त केली आहे. आमच्या मागण्या पूर्ण होऊ नये व सेवेत कायम करण्यापासून परावृत्त करण्यासाठी नव्याने नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान गोंदिया येथे नोंदणी करण्याचा हा शासनाचा डाव आहे. असा आरोप गाईड संजय शहारे यांनी केला आहे.
नोंदणीची पूर्वसूचना नाही
वनपरिक्षेत्राधिकारी नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान यांनी ६ मार्चचे पत्र ११ मार्चला देऊन नव्याने नोंदणी करण्यास सांगीतले. पण त्यापूर्वी कुठलीही लेखी किंवा तोंडी सूचना त्यांनी न देता तुम्ही नवेगाव-नागझिरा व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान गोंदियाची नवीन नोंदणी ६ मार्चपर्यंत करा तुम्ही प्रतिष्ठानकडे नोंदणी न केल्यामुळे १० मार्चपासून राष्ट्रीय उद्यानाच्या खोली,जांभळी, बकी या प्रवेशद्वारावर पर्यटक मार्गदर्शकांना प्रवेश देणे बंद केले आहे.