नवेगावबांध पर्यटन संकूल; निधी असूनही पर्यटन विकासात खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:16 AM2018-11-24T11:16:18+5:302018-11-24T11:16:42+5:30
नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवेगावबांध येथील पर्यटन संकुल परिसरात विविध विकास कामे करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निधीतून अद्यापही विकास कामांना सुरूवात करण्यात आली नाही. जिल्हा नियोजन विभागाच्या तारीख पे तारीख धोरणाचा येथील पर्यटन स्थळाच्या विकासावर परिणाम होत आहे.
नवेगावबांध येथे तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने या ठिकाणी दरवर्षी विदेशी पक्षी मोठ्या संख्येनी येतात. तर हा परिसर निसर्गरम्य असल्याने त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा सुध्दा मिळाला आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प लागून असल्याने दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक येथे भेट देतात. यातून स्थानिकांना रोजगार व शासनाला महसूल प्राप्त होतो. हीच बाब हेरून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने नवेगावबांध फाऊंडेशनने पर्यटक संकुलाच्या विकासासाठी मागील तीन वर्षांपासून कंबर कसली. पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी फाऊंडेशनने पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे साकडे घातले. आंदोलनाचा पावित्रा घेतला होता. त्यानंतर बडोले यांनी पाठपुरावा करुन पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी ८ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी शासनाकडून मंजुर करुन घेतला.हा निधी जिल्हा नियोजन विभागाला प्राप्त सुध्दा झाला आहे. मात्र मागील वर्षभरापासून नियोजन विभागाला या निधीचे नियोजन करुन विकास कामे सुरू करण्यास वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री बडोले यांनी पर्यटन संकुल परिसरातील कामे त्वरीत सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र यानंतरही अधिकाºयांनी ही बाब गांर्भियाने घेतली नाही. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराला भेट देवून कामे सुरू करण्यासाठी संबंधित विभागाची लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते सुध्दा फोल ठरल्याचे चित्र आहे. या सर्व गोष्टींचा मात्र येथील पर्यटन विकासावर परिणाम होत आहे.
पर्यटकांचा हिरमोेड
१९७१ साली राज्य शासनाने या परिसराला नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. तेव्हापासून एक वैभव संपन्न राष्ट्रीय उद्यान म्हणून नावारुपाला आले. देश, विदेशातून व राज्यातून लाखो पर्यटक येथे भेट देवू लागले. येथील प्राणी संग्रहालयामुळे राज्यातील शैक्षणिक सहलीचे हे राष्ट्रीय उद्यान एक प्रमुख केंद्र बनले. मनोहर उद्यान, हॉलीडे होम्स गार्डन,हिलटॉप गार्डन, बालोद्यान, वैभव गार्डन, संजय कुटी, जलाशयातील नोका विहार यामुळे हे राष्ट्रीय उद्यान पर्यटक संकुल परिसर पर्यटकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
या कामांवर परिणाम
शासनाने मंजुर केलेल्या निधीतून जे. टी.पार्इंट रोपवे, हिलटॉप विश्रामगृह, शेगावच्या धर्तीवर गेट व रस्त्याचे सुशोभीकरण,इंटरपिटीशन सभागृह, अंतर्गत रस्ते व बगीच्याचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा, नैसर्गिक पायवाट, तलावाशेजारी बीच, जे.टी.पार्इंटवर बैठक व्यवस्था, अॅडव्हांटेज स्पोर्ट आदी कामे केली जाणार होती.