Nawab Malik: क्रुझवरील रेव्ह पार्टीत एका रेस्टॉरंटमधून जेवण गेले त्यात ड्रग्ज होते; नवाब मलिकांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 19:42 IST2021-10-30T19:41:23+5:302021-10-30T19:42:14+5:30
एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

Nawab Malik: क्रुझवरील रेव्ह पार्टीत एका रेस्टॉरंटमधून जेवण गेले त्यात ड्रग्ज होते; नवाब मलिकांचा मोठा दावा
गोंदिया: शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी न घेता समीर वानखेडे याने प्रायव्हेट आर्मी तयार करुन दहशत निर्माण केली होती हे भविष्यात सिध्द करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
क्रुझवर ड्रग्जची रेव्ह पार्टी झाली आणि त्या पार्टीमध्ये एका रेस्टॉरंटमधून जे जेवण गेले त्यातूनच ड्रग्ज गेले होते. ते सगळे पुरावे समोर आणणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. एनसीबीच्या डीजींकडे माझ्याकडे असलेले रितसर पुरावे पाठवणार आहे. इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल त्यांच्या कार्यालयातील आहेत. जागेवर जाऊन मुद्देमाल जप्त केला जात नाही. कार्यालयात आणून हे सर्व केले जातेय. एका कोर्या कागदावर सह्या घेतल्या जात आहेत. समीर वानखेडे याने एक प्रायव्हेट आर्मी तयार केली असून, त्यामध्ये प्लेचर पटेल, आदिल उस्मानी, के. पी. गोसावी, मनीष भानुशाली यासारखे अनेक लोक आहेत. हे सर्व घरात घुसून ड्रग्ज ठेवत आहेत आणि लोकांना अडकवत आहेत हे सगळे फर्जीवाडा असून याची संपूर्ण माहिती काढली असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही
सोशल मीडियावर लाल कपडे टाकून नवाब मलिक घाबरतील, असे वाटत असेल तर आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि चोरांना तर नाहीच नाही, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कालच फर्निचरवाला नावाच्या मुलीने तिच्या बहिणीला कसे अडकवले त्यावेळी प्लेचर पटेल उपस्थित होता, हे सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आणखी मोठा उलगडा होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.
दरम्यान, या देशात कायद्याने माझ्या परिवाराला व्यापार करण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे आहे ते सर्व कागदोपत्री आहे. ज्यांच्या बेनामी संपत्ती आहे, सोशल मीडियावर लाल गाठोड दाखवत आहेत, असे चोर लोक माझ्याकडे बोट दाखवत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी नाव न घेता केला.