गोंदियात नक्षलवादी रजूलाचे आत्मसर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 05:02 PM2018-09-14T17:02:12+5:302018-09-14T17:05:09+5:30

नक्षल चळवळीत सहभागी करण्यासाठी जुलै २०१७ मध्ये नक्षलवाद्यांनी उचलून नेलेल्या मुलीने पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. नक्षलवाद्यांसोबत वर्षभर राहिलेली ही नक्षलवादी तरूणी के.के.डी. दलमची सदस्य होती.

Naxalite Rajula surrenderd in Gondiya | गोंदियात नक्षलवादी रजूलाचे आत्मसर्पण

गोंदियात नक्षलवादी रजूलाचे आत्मसर्पण

Next
ठळक मुद्दे२०१७ मध्ये पळवून नेले होते२४ एप्रिलच्या नागनडोह चकमकीत सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षल चळवळीत सहभागी करण्यासाठी जुलै २०१७ मध्ये नक्षलवाद्यांनी उचलून नेलेल्या मुलीने पोलिसांसमोर आत्मसर्पण केले. नक्षलवाद्यांसोबत वर्षभर राहिलेली ही नक्षलवादी तरूणी के.के.डी. दलमची सदस्य होती. रजूला उर्फ अनिता रवेलसिंग हिडामी (१७,रा. लवारी, गडचिरोली) असे तिचे नाव असल्याची माहिती पोलीस अधिक्षक हरिष बैजल यांनी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व अप्पर पोलीस अधिक्षक संदीप आटोळे यांच्या उपस्थितीत दिली.
रजूलाने आदिवासी आश्रमशाळा गोटे येथे ७ व्या वर्गापर्यंतचे शिक्षण घेतले. तिने सन २०१५ मध्ये शाळा सोडली व आपल्या कुटुंबासोबत शेळ्या चारणे व घरगुती काम करीत होती. जुलै २०१७ मध्ये धानाचे रोवणे सुरु असताना गावाच्या शेतात शेळ्या चारण्यास ती गेली असता नक्षलवाद्यांनी तिला चल म्हटले यावर येत नाही असे ती म्हणाली. त्यावेळी तिला सीम कार्ड नसलेले मोबाईल मागितले असता तिने नक्षलवाद्यांना मोबाईल दिला. आम्हास रस्त्यापर्यंत सोडू दे असे म्हटल्यावर तिने त्यांना सोडण्यास नकार दिला.
परंतु नक्षल्यांनी तिला जबरदस्ती रस्त्यापर्यंत नेले. ती ६-७ दिवस दलममध्ये राहिल्यावर तिने परत जाण्याबाबत विचारले असता नक्षलवाद्यांनी तू परत गेल्यावर पोलीस तुला अटक करतील आाणि जेलमध्ये पाठवतील, अशी भिती दाखविली. दलममध्ये ठेवल्यानंतर किंवा भरती झाल्यानंतर दलममध्ये राहून पोलीसांविरुद्ध लढा देण्यासंबंधात तिला प्रशिक्षण देण्यात आले. ती कोरची व टिप्पागड दलमच्या लोकांना नावानिशी ओळखत आहे. आत्मसमर्पणानंतर तिला सध्या १० हजार रूपयांची मदत करण्यात आली असून दोन लाख रूपये लवकरच शासनाकडून मदत दिली जाणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १९ जणांचे आत्मसमर्पण
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शासनाने २००५ पासून नक्षलवाद्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. सन २०१४ मध्ये पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या काळात दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते.

अशी सुटकेसाठी झाली मदत
२४ एप्रिल २०१७ नंतर नक्षल संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये रजूलाला प्रशिक्षणासाठी पाठविण्याची चर्चा झाली. रजूला ही १५ ते २० दिवसांपूर्वी लवारी जवळील जंगलात रात्रीला मुक्कामाला होती. पहाटे ३ वाजता रजूलाची संत्री ड्युटी असल्याने दलम सदस्य अंजलीने तिला झोपेतून उठविले. त्यावेळी दलम सदस्य अंजली तीच्या सोबत होती. तिने रजूलाला विचारले तुझी घरी जायची इच्छा असेल तर आताच पळून जाऊ शकते, नाही तर तुला प्रशिक्षणासाठी पाठविणार आहेत. प्रशिक्षण झाल्यावर ४-५ वर्षे छत्तीसगडकडे दलममध्ये ठेवणार आहेत. म्हणून रजुला तेथेच बंदूक ठेवून निघून गेली. दिवसभर जंगलात राहून ती रात्री ८ वाजता दरम्यान लवारी येथे पोहोचली. घरच्यांनी तिला नातेवाईकांच्या मदतीने देवरीच्या २ पोलीसांसोबत देवरीत आणले. रजूलाने २४ आॅगस्ट २०१८ रोजी अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प-देवरी यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले. जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय समिती समोर शुक्रवारी (दि.१४) तिला हजर करण्यात आले आहे.

या कारवाईत सहभाग
छत्तीसगड बॉर्डरवर सप्टेंबर २०१७ मध्ये टिप्पागड दलम सोबत एपीटी (अपॉईन्मेट) बैठक होती. याच ठिकाणी दलम रात्री मुक्कामाला असता पहाटे ५ वाजता छत्तीसगड पोलिसांसोबत चकमक झाली. त्यात कोणतेही नुकसान झाले नाही. त्यानंतर २ दिवसांनी कुमुळ गावाकडे गेलेल्या पार्टीसह पोलीसांसोबत चकमक झाली. त्यामध्ये पार्टीचे मोठे नुकसान झाले. चकमकीमध्ये एक इंसास रायफल, एक ३०३ रायफल, ३ बाराबोर बंदूक व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. २४ एप्रिल २०१८ ला नागनडोह (पो.स्टे.केशोरी जि.गोंदिया) जंगल भागात कॅम्प लावून रात्री मुक्कामाला नक्षलवादी होते. तेव्हा कोरची दलमचे ३ लोक पहाटे नागनडोह गावात गेले व त्यांनी गावात पोलीस असल्याचे पाहून फायरिंग सुरु केली होती. त्यात एक नक्षलवादी (सतीश उर्फ दिनकर गोटा) हा जखमी झाला होता. त्यावेळेस रजूला कॅम्पमध्ये होती व फायरिंगचा आवाज आल्याने तेथून जखमी नक्षलवाद्यांसोबत पळून गेली होती.

Web Title: Naxalite Rajula surrenderd in Gondiya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.