५३ गावांत नक्षलवाद्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2022 05:00 AM2022-04-28T05:00:00+5:302022-04-28T05:00:01+5:30

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतमध्ये पारीत करून तो शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहेत. या नक्षलग्रस्त गावांतील जनता भयमुक्त राहावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी सन २००५ पासून आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले.

Naxals banned in 53 villages | ५३ गावांत नक्षलवाद्यांना बंदी

५३ गावांत नक्षलवाद्यांना बंदी

Next

नरेश रहिले 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नक्षल चळवळ मोडीत काढणे गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत नक्षलवाद्यांना सहकार्य न करण्याचे धैर्य आणण्यात पोलीस आणि तंटामुक्त गाव समित्यांना यश येत आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याऱ्या गावांची संख्या ५३ झाली आहे. आणखी ६१ गावांत अशा पद्धतीची बंदी करण्याचे लक्ष्य पोलिसांनी ठेवले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतमध्ये पारीत करून तो शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहेत. या नक्षलग्रस्त गावांतील जनता भयमुक्त राहावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी सन २००५ पासून आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला. व्यायामशाळा उघडल्या. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, वृद्धांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून दिला. 
  सुरुवातीला आदिवासी नागरिक पोलिसांना सहकार्य करीत नव्हते, पण या सर्व सोईसुविधा देण्यात आल्यामुळे आदिवासी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आणि ते पोलिसांना सहकार्य करू लागले. त्यातच महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने पोलिसांच्या कार्याला बळ मिळाले. गावागावातील तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या प्रत्येक कामात सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. आदिवासी जनतेच्या मनात कायमचे घर करण्याचे काम जिल्हा पोलिसांनी केले. 
सन २००५ पासून आजपर्यंत केलेल्या अविरत मेहनतीमुळे जिल्ह्यातील ११४ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गावात बंदी करून, विकासात्मक कार्याकडे पाऊल उचलले आहे. आता उर्वरित ६१ गावांत नक्षलवाद्यांना बंदी करण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 

प्रत्येक गावाला तीन लाख रुपये अनुदान
ज्या गावांनी नक्षल गावबंदी केली, अशा प्रत्येक गावाला तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ४८ गावांना एक कोटी ४४ लाख देण्यात आले आहेत.  या योजनेतून मिळालेला निधी गावाच्या विकासावर खर्च करण्यात येतो, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 तंटामुक्त मोहीम ठरली दुवा
- पूर्वी गावकरी पोलिसांना सहकार्य करीत नसल्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांत वाढ झाली होती, परंतु महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेमुळे नक्षलवाद्यांना जनतेपासून दूर जाण्यास बाध्य करण्यात आले. तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. परिणामी, आदिवासी जनतेने नक्षलवाद्यांना सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेत, चक्क ग्रामसभेत ठराव घेतला. पोलीस व आदिवासी जनतेत समन्वय घडवून आणण्याचे काम महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने केले. ही मोहीम पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुवा म्हणून पुढे आली आहे.

 

Web Title: Naxals banned in 53 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.