राष्ट्रवादी-काँग्रेसला कौल

By admin | Published: July 7, 2015 12:45 AM2015-07-07T00:45:55+5:302015-07-07T00:45:55+5:30

गोंदिया जिल्हा परिषदेच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही.

NCP-Congress Kaul | राष्ट्रवादी-काँग्रेसला कौल

राष्ट्रवादी-काँग्रेसला कौल

Next

गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. मात्र ५३ पैकी सर्वाधिक २० जागा राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकून मतदारांनी खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक २० जागा मिळाल्या असून सत्तारूढ भाजपला अवघ्या १७ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला १६ जागांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
जिल्हा परिषदेसोबत पंचायत समित्यांमध्येही काही ठिकाणी बदल झाला आहे. आठ पैकी चार पंचायत समित्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र त्यापैकी ३ ठिकाणीच स्पष्ट बहुमत आहे. त्यात देवरी, गोरेगाव आणि सडक अर्जुनी या पंचायत समित्यांचा समावेश आहे. अर्जुनी मोरगाव येथे १४ पैकी ७ जागा भाजपला मिळाल्याने बहुमतासाठी भाजपला कसरत करावी लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून भाजपची एक जागा बळकावल्यास तिथे भाजपला विरोधात बसावे लागू शकते.
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत यावेळी एकाही अपक्षाला संधी मिळाली नाही. मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या तीन राष्ट्रीय पक्षातच झाली. शिवसेनेने काही जागा लढविल्या, मात्र जिल्हा परिषदेत सेनेला खातेही उघडता आले नाही. मनसे आणि इतर पक्षांनाही मतदारांनी पसंत केले नाही. पंचायत समितीमध्ये देवरीत शिवसेनेला दोन जागा मिळाल्या. गोरेगावमधील एक अपवाद वगळता अपक्षांना कुठेच संधी मिळाली नाही.
२०१० च्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसला ७ तर काँग्रेसला ६ जागा जास्त मिळाल्या असून भाजपला १० जागा गमवाव्या लागल्या. जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत. एक खासदार आहे. असे असताना जिल्ह्यातील नागरिकांनी भाजपच्या उमेदवारांना का नाकारले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी आणि गोरेगाव या पंचायत समित्यांमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.
आमगाव-देवरी मतदार संघातील भाजपचे आमदार संजय पुराम यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या मावळत्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांना या निवडणुकीत अनपेक्षित हार पत्करावी लागली. देवरी तालुक्यातील पुराडा मतदार संघात काँग्रेसच्या उषा शहारे यांच्याशी झालेली त्यांची लढत लक्षवेधी ठरली. आ.संजय पुराम यांच्या विधानसभा निवडणुकीत मेहनत घेऊन सविता पुराम यांनी मतदारांना खेचण्यात मदत केली होती. मात्र यावेळी आ.पुराम यांचा प्रभाव त्यांना मते मिळवून देऊ शकला नाही.
जिल्ह्यातील राजकारणात मातब्बर तीन माजी आमदारांच्या पूत्र-पुत्रींनाही पराभवाचे तोंड पहावे लागले. कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार रामरतन राऊत यांच्या कन्या सुषमा राऊत, गोरेगाव-तिरोडा विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ.खुशाल बोपचे यांचे पुत्र आणि प्रदेश भाजयुमोचे उपाध्यक्ष रविकांत बोपचे आणि माजी आ.केशव मानकर यांचे पुत्र हरिहर मानकर यांनाही मतदारांनी नाकारले. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. गोंदिया तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन फुलचूरपेठ, फुलचूर येथे झाली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)

काँग्रेसला हवे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद !
जिल्हा परिषदेत कोणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने तीनपैकी कोणीतरी दोन पक्षांनी एकत्रित आल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही. सर्वाधिक जागा (२०) राष्ट्रवादीकडे असल्यामुळे सत्ता स्थापन करण्याचा पहिला अधिकार त्यांचा आहे. समविचारी पक्ष म्हणून आणि अनेक वर्षांपासून राज्य आणि राष्ट्रीय राजकारणात सत्तेत एकत्रितपणे वाटा उचलणाऱ्या काँग्रेससोबत आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस सहजपणे सत्ता काबीज करू शकते. मात्र काँग्रेसने आपल्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हवे, अशी अट घातल्याची माहिती आहे. वास्तविक काँग्रेसच्या वाट्याला १६ जागा आल्या असल्याने पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादी आणि नंतरचे अडीच वर्षे काँग्रेसकडे अध्यक्षपद देण्याचा प्रस्तावही दिला जाऊ शकतो. मात्र आधी आम्हाला अध्यक्षपद द्या, तरच साथ देऊ अशी भूमिका काँग्रेसने घेतल्याने नवीन पेच निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत जि.प.चे राजकारणात काय घडते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. यासंदर्भात काँग्रेसचे कोणीही वरिष्ठ पदाधिकारी प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत.

Web Title: NCP-Congress Kaul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.