प्रवीण दरेकरांविरुद्ध राष्ट्रवादीच्या महिलांची पोलिसांत तक्रार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:58+5:302021-09-25T04:30:58+5:30
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाच्या महिलांबद्दल असभ्य व गैरजबाबदारीचे वक्तव्य ...
अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाच्या महिलांबद्दल असभ्य व गैरजबाबदारीचे वक्तव्य केले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार राष्ट्रवादी पक्षाच्या महिलांनी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात केली आहे.
पुणे जिल्ह्यातील मौजे शिस्त्र येथे १३ सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरेकर यांनी भाषणात, राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, असे वक्तव्य केले. या वक्तव्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, समाजमाध्यमे, टीव्ही चॅनल्सवरून, तसेच वर्तमानपत्रातून वृत्त प्रसारित झाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे तमाम महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होऊन महिलांच्या विनयशीलतेचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचवून दोन गटात तेढ निर्माण केली आहे. त्यांचे हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनमानसातील प्रतिमेला नुकसान पोहोचवून समाजात पक्षाची प्रतिमा मलिन करणारे आहे. दरेकर यांनी दखलपात्र गुन्हा केला असून त्यांच्यावर भांदविचे कलम १५३, ५००, ५०९ प्रमाणे कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार पक्षाच्या जिल्हा महिला उपाध्यक्षा चित्ररेखा मिश्रा, माधुरी पिंपळकर, मनीषा लाडे, वनीता मेश्राम, पुष्पा दखणे व अर्चना बन्सोड यांनी केली आहे. तक्रारीची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आली आहे.
240921\1638-img-20210924-wa0010.jpg
सपोनि सोमनाथ कदम यांना तक्रार करतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला