जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख

By अंकुश गुंडावार | Published: November 22, 2023 09:44 PM2023-11-22T21:44:26+5:302023-11-22T21:44:36+5:30

हिवाळी अधिवेशनाची वाट न पाहता धानाला बोनस जाहीर करा

NCP's claim on two assembly constituencies in the district upheld - Anil Deshmukh | जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख

जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख

गोंदिया: खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निर्णय लवकरच होईल. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संपूर्ण ताकीदीने विदर्भासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीत लढवेल. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघावर पुर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दावा कायम राहिल. तसेच लोकसभा मतदारसंघाबाबत सुध्दा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी गोंदिया येथे बुधवारी (दि.२२) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

स्थानिक प्रिन्स लाॅन येथे आयोजित पत्रकार परिषदेला खा. खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, माजी आ. दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, रविकांत बोपचे, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मिथून मेश्राम उपस्थित होते. अनिल देशमुख म्हणाले महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सरकारचे सर्व लक्ष याच गोष्टींकडे आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार व जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेच्या मनात या सरकारप्रती प्रचंड आकस असून हा आकस २०२४ निवडणुकीत दिसून असा दावा केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र या सरकारने हेक्टरी बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. धानाला बोनस जाहीर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा न करता त्वरित हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी यावेळी केली. यावेळी त्यांनी क्लिन चिट व त्यांची मुलगी आणि सून यांच्यावर दाखल झालेल्या आरोपपत्रावर बोलणे टाळले. तसेच भाजपने आपल्यावर केलेले आरोप हे तथ्यहिन असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.

दवाबामुळेच ते नेते महायुतीत
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट ना. अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. त्यांच्यावर ईडी व सीबीआय कारवाई करण्याची होण्याची शक्यता असल्याने व दबावामुळे तेच महायुतीत सहभागी झाले. याची स्पष्टोक्ती ते आम्ही यंत्रणेच्या दबावामुळे गेलो नसल्याचे सांगून देत असल्याचा टोलाही देशमुख यांनी लगावला.

१२ डिसेंबरला युवा संघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप

आ.रोहीत पवार यांच्या नेतृत्वात निघालेली युवा संघर्ष यात्रा ८०० किमीचे अंतर पार करुन १२ डिसेंबरला नागपूर येथे दाखल होत आहे. या यात्रेचा नागपूरात समारोप होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

 

 

Web Title: NCP's claim on two assembly constituencies in the district upheld - Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.