राष्ट्रवादीच्या मोर्चाची जोरदार धडक
By admin | Published: December 11, 2015 02:18 AM2015-12-11T02:18:01+5:302015-12-11T02:18:01+5:30
आमगाव तालुका व संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसोबत शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी
दुष्काळग्रस्त घोषित करा : शेतकरी-बेरोजगारांचेही प्रश्न सोडवा
आमगाव : आमगाव तालुका व संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याच्या मागणीसोबत शेतकरी, शेतमजूर आणि बेरोजगारांच्या विविध मागण्यांसाठी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमगावात धडक मोर्चा काढण्यात आला. माजी आ.दिलीप बन्सोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, कृउबा समितीचे सभापती रमेश ताराम, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी, बेरोजगार सहभागी झाले होते.
स्थानिक राधिका लॉन बनगाव येथून प्रारंभ झालेला हा मोर्चा कामठा चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक येथून पुन्हा गांधी चौकात येऊन तिथे सभेत रुपांतरित झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करून उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन सादर केले. त्यात आमगाव तालुका व जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, धानाला ३ हजार रुपये भाव द्या, कृषी बिल माफ करा, आणेवारी पद्धत बदलवा, शेतकऱ्यांना रबीसाठी मोफत बियाणे द्या, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करा, ओबीसी विद्यार्थ्यांना नियमित शिष्यवृत्ती द्या यासह वीट भट्टी, ट्रॅक्टर असोसिएशन व आमगाव तालुक्याच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. मोर्चाला मार्गदर्शन करताना माजी आ.दिलीप बन्सोड यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करून नवीन वीज कनेक्शन तातडीने देण्याची मागणी केली. माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी बोगस बियाणे आणि बोगस कीटकनाशकामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली. सभापती रमेश ताराम, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, महेश जैन, सुरेश हर्षे यांनीही मार्गदर्शन केले.
या मोर्चात प्रामुख्यने कमल बहेकार, माजी सभापती टिकाराम मेंढे, जि.प.सदस्य सुखराम फुंडे, जियालाल पंधरे, राजेश भक्तवर्ती, पं.स.सदस्य प्रमोद शिवनकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिक तथा ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)