व्यसनमुक्त युवा वर्गाची गरज
By admin | Published: June 28, 2017 01:28 AM2017-06-28T01:28:54+5:302017-06-28T01:28:54+5:30
दारु, गांजा, हॅरोईन, भांग, चरस, अफिम, व्हाईटनर, बोन फिक्स आदी सारख्या मादक पदार्थाचे व्यसन व्यक्तीला नाही तर
दिलीप भुजबळ पाटील : शहरात समता दिंडीचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दारु, गांजा, हॅरोईन, भांग, चरस, अफिम, व्हाईटनर, बोन फिक्स आदी सारख्या मादक पदार्थाचे व्यसन व्यक्तीला नाही तर व्यक्तीच्या कुटूंबाचा सर्वनाश करतात. कोणतेही व्यसन समाजासाठी एका कॅन्सर रोगासारखे आहे. युवकांनी या व्यसनापासून मुक्त होवून दुसऱ्यांना व्यसन मुक्त करावे. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी व्यसनमुक्त युवा वर्गाची काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिनानिमित्त श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थाद्वारे संचालित बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राद्वारे आयोजीत समता दिंडीत ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाचे मंगेश वानखेडे, समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा दलित मित्र ठाकुर, बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक विजय बाहेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी बाहेकर व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक बाहेकर यांनी, गोंदियात सर्वाधिक दारुचे व्यसनी लोग आहेत. बाहेरील ब्राऊन शुगर व गांजाच्या व्यसनी लोकांना केंद्रात आणले जाते. जिल्ह्यात ५ वर्षापूर्वी २५-४० वर्षाचे लोक अधिक व्यसनी होते. परंतु आता त्यांची जागा १३-२५ वयोगटातील तरुणांनी घेतली आहे. केंद्राद्वारे आतापर्यंत ३००० व्यसनींना व्यसनमुक्त करण्यात आल्याचे सांगीतले. समता दिंडीची सुरुवात इंदिरा गांधी स्टेडियमपासून अतिरीक्त जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी राधाबाई बाहेकार नर्सिग शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी व बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी कलापथक सादर करुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला. रॅलीचे समापन भारतीय संविधानाचे रचयिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात करण्यात आली.
यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. बाहेकर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक बाहेकर यांनी सर्व मान्यवरांना केंद्रातर्फे वृक्ष भेट केले. संचालन करून आभार राजेश मिश्रा यांनी मानले. कार्यक्रमासाठी बाहेकर व्यसनमुक्ती केंद्र व राधाबाई बाहेकर नर्सिग स्कूलचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यानी सहकार्य केले.