बाबासाहेबांच्या विचारांची गरज
By admin | Published: February 24, 2016 01:51 AM2016-02-24T01:51:11+5:302016-02-24T01:51:11+5:30
माणसा-माणसांमधील भेदभाव वाढत आहे. हा अमक्याचा तो तमक्याचा, याप्रमाणे थोर पुरूषांचे वाटप झालेले आहे.
कला महाविद्यालयात व्याख्यानमाला : सुनील चवळे यांचे प्रतिपादन
जवाहरनगर : माणसा-माणसांमधील भेदभाव वाढत आहे. हा अमक्याचा तो तमक्याचा, याप्रमाणे थोर पुरूषांचे वाटप झालेले आहे. सार्वभोमत्त्वाचा विचार केल्यास माणसांना जोडणारे विचार जर कोणाचे असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे आहे. त्यांच्या विचारांचे चिकित्सक मुल्यमापन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. सुनिल चवळे यांनी व्यक्त केले.
कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप जवाहरनगर येथील युजीसी दिल्ली द्वारा पुरस्कृत डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राद्वारे ‘डॉ. आंबेडकर एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावर व्याख्यानमाला प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था सचिव डॉ. जी.डी. टेंभरे हे होते. यावेळी प्राचार्य अजयकुमार मोहबंशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. रत्नपाल डोहाणे, प्रा. डॉ. नलिनी बोरकर उपस्थित होते.
यावेळी चवळे यांनी, डॉ. आंबेडकरावर मार्क्सवादी अर्थशास्त्रज्ञ प्रा. सिनिमगन, लोकहितवादी प्रा. जॉन डूथी, संत कबीर व एन्डावन कॅनन या गुरूजनांचा प्रभाव पडलेला होता. त्यांच्या मते डॉ. आंबेडकर हे उदामतवादी व्यवस्थेकडून समाजवादी व्यवस्थेकडे झुकले होते. सांसदीय लोकशाहीमध्ये आर्थिक समतेला महत्व असावे असा त्यांचा दृष्टीकोन होता. प्रत्येकाला काम, शिक्षण, आरोग्याचा मुलभूत अधिकार असावा असा त्यांचा दृष्टीकोन होता, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जी.डी. टेंभरे यांनी, वस्तुनिष्ठ वैज्ञानिक दृष्टीकोनातून डॉ. आंबेडकरांच्या विचारांची समिक्षा करण्यात यावी, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. रत्नपाल डोहाणे यांनी केले.
संचालन अस्मिता खोब्रागडे यांनी केले. आभार प्रा. डॉ. नलिनी बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा. डॉ. आर.टी. पटले, प्रा. देवराव डोरले, प्रा. आर. पी. बावणकर, डॉ. आर. आर. चौधरी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)