सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जागरुकता हवी
By admin | Published: March 2, 2017 12:14 AM2017-03-02T00:14:11+5:302017-03-02T00:14:11+5:30
आजच्या वैज्ञानिक युगात प्रत्येकाजवळ एंड्रायड फोन आहेत. त्यासोबत इंटरनेटची उपयोगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
ठाणेदार सुरेश कदम : मोबाईल-इंटरनेटच्या माध्यमातून वाढले गुन्हे
एकोडी : आजच्या वैज्ञानिक युगात प्रत्येकाजवळ एंड्रायड फोन आहेत. त्यासोबत इंटरनेटची उपयोगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातूनच अनेक प्रकाराचे सायबर गुन्हे पण वाढत आहे. प्रामुख्याने महाविद्यालय व शाळकरी मुले-मुली याबाबत विशेष जागरुक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे यांनी मोठ्या प्रमाणावर जागरुक होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ठाणेदार सुरेश कदम यांनी केले.
श्री समर्थ एज्युकेशन संस्था दांडेगावद्वारे संचालित अध्यापक विद्यालय दांडेगाव येथे अध्यापन करीत असलेले व समर्थ हायस्कूल दांडेगाव येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना सायबर गुन्हे याबाबत जागरुक करण्यासाठी शनिवारी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्यात ते मार्गदर्शन करीत होते.
ते पुढे म्हणाले, अनेकवेळा या गुन्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक होते. मोबाईल व इंटरनेट वापरकर्त्याकडून त्यांच्याकडील उपलब्ध डाटा चोरुन त्यांच्याकडील गोपनिय माहिती मिळवून त्याचा गैरफायदा उचलला जातो. त्याचप्रकारे एंड्रायड मोबाईल व लॅपटॉप, कंप्युटरद्वारे करण्यात येत असलेल्या डाऊंलोडिंगवेळी खूप सतर्क रहावे. कित्येक वायरस असे आहेत जे डाऊनलोडिंग व अपेडट करतेवेळी आपला डेटा व गोपनिय माहिती हॅकरपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. या सर्वांची उपयोगकर्त्याला साधी भनकही लागू दिली जात नाही. त्यांनी फेसबुक, वॉटसअप, ई-मेल आई-डी व त्यांचे पासवर्ड कोणालाही न सांगता गोपनिय ठेवावे. तर इंटरनेट बँकिंग, एटीएम यांची गोपनियता जवळचे संबंधित व नातेवाईक यांच्यापासूनही लपवून ठेवावे. उत्सुकतेमुळे महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनी उपयोकर्ते व्हीडिओ, फोटो, मजकूर शेअर करतात. विशेषत: मुलींनी व महिलांनी फेसबुक किंवा कोणत्याही सोशल माध्यमांद्वारे अनोळखी व्यक्ती एड करू नये. कारण काही कालावधीसाठी त्या व्यक्तीची मित्रता चांगली वाटते. परंतु मित्रतेतून गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार निदर्शनात येत आहेत. अशा अनेक गुन्ह्यातून जागरुक राहूनच आपला व इतरांचा बचाव करता येतो, असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानी समर्थ एज्युकेशन संस्थेचे संस्थापक सचिव जे.ए. पटले होते. अतिथी म्हणून सरपंच सुरेश पटले, पोलीस पाटील हिवराज ताजने, नागोराव लिचडे, मुख्याध्यापक सी.एच. भैरम, हेमलता येळे, डी.जी. रिनाईत उपस्थित होते. संचालन प्रा.एन.आर. पटले यांनी केले. आभार प्राचार्य जी.एच. ठोबरे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी कृष्णा कोडापे, डी.ए. खरोदे, प्रकाश वासनिक, अशोक काळसर्पे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)